Ants in Your House : जगभरात जवळपास २२ हजार मुंग्यांच्या प्रजाती आहेत. उष्णकटिबंधीय देशात मुंग्या सर्वात जास्त आढळतात. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात वरचा क्रमांक आहे. मुंग्यांच्या विविधतेसाठी ऑस्ट्रेलिया हे जागतिक आकर्षण केंद्र आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की येथे जगातील सर्वात समृद्ध मुंग्यांची जैवविविधता असू शकते, फक्त उष्णकटिबंधीय भागात अंदाजे पाच हजार प्रजाती आहेत. पण मुंग्या इतरस्त्र कशा दिसतात? सर्वच भागात त्यांचं अस्तित्व कसं जाणवतं? उंचा इमारतींमधील घरांतही त्यांचं वास्तव्य कसं होतं? हे आज आपण जाणून घेऊयात.

पृथ्वीतलावर मुंग्या वर्चस्व गाजवतात. म्हणजेच संपूर्ण ग्रहावर जवळपास अंदाजे २० क्वाड्रिलियन मुंग्या जिवंत असतात. म्हणजेच २० नंतर १५ शून्य. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक माणसामागे अंदाजे २५ लाख मुंग्या असतात. आपण अशा ग्रहावर राहतो जिथे मुंग्यांची संख्या आपल्यापेक्षा जवळजवळ अकल्पनीय आहे.

वेगवेगळ्या मुंग्यांच्या प्रजाती संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. परंतु ज्या मुंग्या आपल्या घरांवर आक्रमण करतात त्या बहुतेकदा फेरोमोन ट्रेल्स ही पद्धत वापरतात. म्हणजेच जेव्हा मुंगीला अन्नाचा स्रोत सापडतो तेव्हा ती तिच्या घरट्यात परत येते आणि जाताना फेरोमोनचे छोटे थेंब सोडते; ही वाट इतर मुंग्यांना त्यांच्या घरट्यातून थेट अन्नाच्या स्रोताकडे घेऊन जाते. या अत्यंत कार्यक्षम संप्रेषण प्रणालीचा अर्थ असा आहे की एक मुंगी तिला सापडणाऱ्या कोणत्याही अन्नासाठी तिच्या घरट्यातील हजारो सोबतींना मार्ग दाखवत असते. मुंग्या पाण्याच्या शोधात देखील आत येऊ शकतात, विशेषतः जेव्हा हवामान गरम असते. काही प्रजाती दमट वातावरणात घरटे बांधण्यास प्राधान्य देतात, म्हणूनच ते बहुतेकदा बाथरूममध्ये आढळतात.

उंच इमारतीतील घरांमध्ये मुंग्या का आढळतात?

मुंग्यांच्या अनेक प्रजाती अपवादात्मक असतात. काही मुंग्यांच्या पायांवर लहान चिकट पॅड आणि बारीक केस असतात. या विशेष रचनेमुळे मुंग्या भिंतींना चिकटून राहतात आणि मानवी डोळ्यांना गुळगुळीत दिसणाऱ्या पृष्ठभागावरही त्यांना पाय ठेवता येतो. उल्लेखनीय म्हणजे, काही मुंग्या उंचावरून पडल्या तरीही त्यांचं संरक्षण होतं. कारण त्यांच्या शरीराची रचना तशी झालेली असते. म्हणून अशा मुंग्या कोठेही आढळतात. अगदी उंच इमारतीच्या घरांमध्येही आणि त्यांच्या बाथरुममध्येही.