Apple Watch Saves Life Of Women: दिल्लीच्या रहिवाशी स्नेहा सिन्हा यांनी ॲपल वॉच 7 ने त्यांचे प्राण वाचवल्याचे सांगत केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ॲपलच्या या स्मार्ट घड्याळाने स्नेहा यांना त्यांच्या हृदयाची गती प्रति मिनिट २५० बिट्सपेक्षा जास्त असल्याचा इशारा दिला होता. सुरुवातीला ही बाब लक्षातही स्नेहांना आली नव्हती, ॲपलच्या इशाऱ्यानंतर त्या सावध झाल्या. तरीही त्यांनी दीड तास शांत होण्याचा प्रयत्न केला पण हा त्रास कमीच न झाल्याने अखेरीस त्यांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. आवश्यक उपचार घेतल्याने त्या आता सुरक्षित आहेत. सुरुवातीला ताण- तणावामुळे वाटत असणाऱ्या या त्रासामागे ॲट्रियल फायब्रिलेशन हे कारण असल्याचे समजतेय. ही स्थिती नेमकी काय, त्याची लक्षणे, प्रकार याविषयी आज आपण मायो क्लिनिकने प्रकाशित केलेली माहिती जाणून घेऊया..
ॲट्रियल फायब्रिलेशन म्हणजे काय?
ॲट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी) ही स्थिती हृदयाची अनियमित आणि अतिशय जलद लय दर्शवते. हृदयाच्या अनियमित लयीला एरिथमिया म्हणतात. AFib मुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. या स्थितीमुळे स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि हृदयाशी संबंधित इतर गुंतागुंत होण्याचा धोका देखील असतो. ॲट्रियल फायब्रिलेशन या स्थितीत, हृदयाच्या वरच्या चेंबर्समध्ये, (ॲट्रिया) मध्ये धडधड वाढते व खालच्या हृदयाच्या चेंबर्स (वेंट्रिकल्स) पासून त्यांचे स्थान समकक्ष राहत नाही. गंभीर बाब म्हणजे अनेकदा, AFib ची लक्षणे जाणवत नाहीत किंवा फार कमी जाणवतात. पण AFib मुळे हृदयाची धडधड वाढणे, धाप लागणे किंवा चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात.
ॲट्रियल फायब्रिलेशन चा त्रास हा एखाद्या झटक्याप्रमाणे असतो, तो येतो, जातो, सतत राहू शकतो किंवा अचानक उफाळून येऊ शकतो. हा त्रास सहसा जीवघेणा नसतो. परंतु ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे स्ट्रोकसारखी जीवघेणे स्थिती उद्भवू शकते. ॲट्रियल फायब्रिलेशनच्या उपचारांसाठी औषधे उपलब्ध आहेत, त्याशिवाय हृदयाला योग्य पंपिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या थेरपी याचा आधारही घेता येऊ शकतो.
ॲट्रियल फायब्रिलेशनची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे
- धडधडणे
- छातीत दुखणे
- चक्कर येणे
- थकवा
- गरगरणे
- व्यायाम करण्याची क्षमता कमी होते.
- धाप लागणे.
- अशक्तपणा.
लक्षात घ्या: एट्रियल फायब्रिलेशन (एएफआयबी) असलेल्या काही लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
हे ही वाचा<< तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? झणझणीत खायला आवडत असेल तर नक्की वाचा
ॲट्रियल फायब्रिलेशनचे प्रकार
- पहिला प्रकार म्हणजे पॅरोक्सिस्मल ॲट्रियल फायब्रिलेशन यामध्ये अधूनमधून AFib ची लक्षणे येतात आणि जातात. लक्षणे सहसा काही मिनिटांपासून तासांपर्यंत टिकतात. काही लोकांना आठवडाभर लक्षणे जाणवतात. या रुग्णांना काही प्रमाणात उपचारांची गरज असते.
- दुसऱ्या प्रकारात अनियमित हृदयाचे ठोके सतत असतात. हृदयाची लय स्वतःच रीसेट होत नाही. लक्षणे आढळल्यास, हृदयाची लय सुधारण्यासाठी वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
- दीर्घकाळ टिकणारा AFib चा प्रकार स्थिर असतो आणि १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकतो. हृदयाचे अनियमित ठोके दुरुस्त करण्यासाठी औषधे किंवा थेरपी आवश्यक आहे.
- या प्रकारच्या ॲट्रियल फायब्रिलेशनमध्ये, हृदयाची अनियमित लय रीसेट केली जाऊ शकत नाही. हृदय गती नियंत्रित करण्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी औषधांची आवश्यकता असते.
त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या, दुर्लक्ष करू नका!