मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला कोणताच व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. त्यामुळेच मुंबईला ‘स्वप्न नगरी’ म्हटलं जातं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या सध्या तीन कोटींहून अधिक आहे. पण काही शतकांपूर्वी मुंबई एक सामान्य शहर होते; मात्र कलांतराने ते बदलत गेले. पण तुम्हाला मुंबईचे मूळ स्थान नक्की कुठे आहे हे ठाऊक आहे का?

या ठिकाणी आहे मुंबईचे मूळ स्थान

मुंबईतील एशियाटिक सोसायटी ऑफ टाऊन हॉल तुम्हाला ठाऊकच असेल. याच हॉलच्या पाठीमागे मुंबईचे मूळ स्थान आहे. हे मूळ स्थान म्हणजे येथे असलेला एक जवळपास ५०० वर्ष जुना वाडा, हेच मुंबईचे मूळ स्थान आहे. ब्रिटीश काळामध्ये या वास्तूला बॉम्बे कॅसल म्हटलं जायचं. हा वाडा जवळपास एक एकर परिसरात पसरला असून याला चार बुरुज आहेत. यातील एक बुरुज पाण्यात असून तीन बुरुज जमिनीवर आहेत. तसेच यातील प्रत्येक बुरुजाला नावदेखील देण्यात आले आहे. या वाड्याचे प्रवेशद्वार खूप सुंदर असून याच्या प्रवेशद्वारावरील भिंतीवर दोन पोर्तुगीज सैनिक वाद्य वाजवताना दिसत आहेत.

‘बॉम्बे कॅसल’चा इतिहास

बॉम्बे कॅसल बांधणारी व्यक्ती एक पोर्तुगीज होती. ती व्यक्ती डॉक्टर होती व खूप लोकप्रियदेखील होती. मात्र, ती व्यक्ती ज्यू होती. पूर्वी पोर्तुगीज लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांना अधिक वाव देत नसतं, त्यामुळे त्या व्यक्तीला ज्यू धर्म बदलून कॅथलिक धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले. त्यावेळी सर्वांसमोर त्याने कॅथलिक धर्म स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर ती व्यक्ती भारतात आली आणि गोव्यात स्थायिक झाली, त्यावेळी त्याने ही जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी ही वास्तू बांधण्यात आली. ही वास्तू मुंबईतील पहिली जुनी अधिकृत वास्तू असून या वास्तूपासून मुंबईची सुरुवात होते असे म्हटले जाते.

कान्हेरी गुहा, बाणगंगा तळे, एलिफंटा केव्स ही ठिकाणंदेखील मुंबईत बऱ्याच वर्षांपासून आहेत. त्यावेळी मुंबई हे महत्त्वाचे शहर नव्हते. पोर्तुगीज काळात मुंबईपेक्षा वसईला अधिक महत्त्वाचे शहर मानले जायचे. आता जगभरात प्रसिद्ध असलेली मुंबई पूर्वी एक सामान्य ठिकाण होते. पण, कालांतराने त्यात मुंबईचे रुपांतर मोठ्या शहरात झाले.

हेही वाचा: पुण्यातील दीडशे ते दोनशे वर्ष जुन्या ‘भिकारदास मारुती’ मंदिराला हे नाव का पडले? जाणून घ्या या नावामागची रंजक कथा

१८३० मध्ये बॉम्बे कॅसल हे भारतीय नौदलाचे मुख्यालय बनले, ज्याची स्थापना जुन्या बॉम्बे मरीनमध्ये झाली. १९३४ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीची निर्मिती आणि जास्त जागेची गरज असल्याने, रॉयल इंडियन नेव्हीने आर्मीच्या मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्सकडून ‘बॉम्बे कॅसल’ची मान्यता मिळवली. बॉम्बे कॅसलचा ताबा नौदलाने कसा मिळवला याची एक मनोरंजक कथा कमांडर स्ट्रॅटिफाइड-जेम्स यांनी त्यांच्या “इन द वेक : द ब्रिटीश ऑफ द इंडियन अँड पाकिस्तान नेव्हीज”मध्ये वर्णन केले आहे.