Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र औरंगजेबाची कबर बांधली कुणी हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊ.
औरंगजेबाची कबर कुठे आहे?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलताबाद या ठिकाणी आहे. ही कबर अत्यंत साधेपणाने बांधली आहे. या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते. तसंच या कबरीवर सब्जाचं झाड आहे. औरंगजेबाची ही कबर कुणी बांधली? याचंही उत्तर आपण जाणून घेऊ.
औरंगजेब महाराष्ट्रात का आला होता?
छत्रपती शिवरायांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यानंतर चार लाखांचा फौजफाटा घेऊन औरंगजेब दख्खन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात १६८१ मध्ये आला. औरंगजेबाला छत्रपती संभाजी राजांनी कडवी झुंज दिली. मात्र १६८९ मध्ये झालेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना हाल करुन ठार केलं. मात्र औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांना ठार केल्यानंतरही महाराष्ट्र जिंकता आला नाही. १४ कोटी रुपयांचा खजिना, ४ लाखांचं सैन घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला. त्याने दौलताबादचं नाव बदलून औरंगाबाद असं केलं होतं. मात्र मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरही औरंगजेबाला कडवी झुंज दिली. राजाराम महाराज, तारा राणी तसंच संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं होतं आणि स्वराज्य राखलं हे आपल्याला माहीत आहे. २७ वर्षे औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी याच राज्यात राहिला पण त्याला ते शक्य झालं नाही. २ मार्च १७०७ ला औरंगजेबाचा मृत्यू झाला.
औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी कुणी बांधली?
आत्ताचे अहिल्यानगर हे पूर्वी अहमद नगर म्हणून ओळखलं जात होतं. १७०७ मध्ये भिंगार येथील किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपला मृत्यू झाल्यास खुलताबाद या ठिकाणी दफन करण्यात यावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. जी औरंगजेबाचा मुलगा आजमशाह याने पूर्ण केली. आजमशाह यानेच औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधली. इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
औरंगजेबाने आपल्या अंत्यविधीबाबत केलं होतं इच्छापत्र
औरंगजेबाने त्याच्या अंत्यविधीबाबत इच्छापत्र लिहून ठेवलं होतं. माझ्या मृत्यूनतर जी कबर बांधाल ती मी जे स्वतः पैसे कमावले आहेत त्याच पैशांतून बांधा. त्यावर सब्जाचं रोप लावा. असं त्याने या इच्छापत्रात लिहिलं होतं. औरंगजेब टोप्या शिवण्याचं काम करत असे तसंच कुराण लिहित आहे. १४ रुपये आणि बारा आणे ही त्याची यातून झालेली कमाई होती. त्याच पैशांमध्ये खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली. झैनुद्दीन सिराजी यांना औरंगजेब गुरु मानत असे. त्यांच्या कबरीशेजारीच औरंगजेबाची कबर त्याच्या इच्छेनुसार बांधण्यात आली आहे.
खुलताबाद या ठिकाणीच कबर का बांधली गेली?
खुलताबादला इतिहास काळात जमिनीवरचा स्वर्ग असं म्हटलं जायचं. या गावात भद्रा मारुतीचं देवस्थान आहे. तसंच या गावात अनेक सूफी संतांच्या कबरी आहेत. त्यामुळेच आपल्या मृत्यूनंतर आपली कबर खुलताबादमध्ये बांधली जावी ही औरंगजेबाजाची इच्छा होती. त्यामुळे औरंगजेबाची कबर खुलताबाद या ठिकाणी बांधण्यात आली. खुलताबाद या ठिकाणी असलेली ही कबर साध्या स्वरुपात आहे. ही कबर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहे. ही कबर महाराष्ट्रातून उखडून टाकावी अशी मागणी आता होते आहे.