Real Name Of Bangkok: आजपर्यंत थायलंड मधील बँकॉक या शहराची विविध प्रकारची ओळख आपण ऐकून असाल. बँकॉक मधील बाजारपेठ, तोंडाला पाणी आणणारे पदार्थ आणि विशेष म्हणजे या शहरातील नाईट लाईफ जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला आज आम्ही बँकॉक शहराची अशी एक ओळख सांगणार आहोत जी कदाचितच याआधी तुम्ही ऐकली असेल. वर वाचून तुम्हाला अंदाज आलाच असावा की बँकॉक शहराच्या ‘नावाची’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विशेष नोंद आहे. थायलंडमधील या जगप्रसिद्ध शहराचे मूळ नाव तीन अक्षरी बँकॉक असे नसून चक्क १६८ अक्षरांनी बनले आहे. सोयीसाठी या शहराला बँकॉक अशी ओळख मिळाली असली तरी या मूळ नावाचा अर्थही तितकाच खोल आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार हे जगातील शहरांपैकी सर्वात लांब नाव असलेले शहर आहे. या नावात तब्बल १६८ अक्षरे असून या प्रत्येक शब्दाचा अर्थ हा बँकॉकचा इतिहास, पौराणिक कथा आणि सांस्कृतिक महत्त्व या सगळ्याशी संबंधित आहे. फक्त नाव घेताच लोकांना विशेषतः पर्यटकांना या शहराची ओळख पटावी या हेतूने इतके मोठे नाव या शहराला देण्यात आले होते.
बँकॉकचे खरे नाव काय?
क्रुंग थेप महानखोन आमोन रतनकोसीन महिन्थारा आयुथया महादिलोक फोप नोपफरात रत्चाथनी बुरिरोम उदोमरत्चानिवेत महासथन आमोन पिमन अवतन सथित सक्कथट्टिया वित्सानुकम प्रसित हे बँकॉकचे खरे नाव आहे.
महिलेने सांगितले बँकॉकचे पूर्ण नाव
@sheswow या अकाउंटवर पोस्ट केलेल्या वरील व्हिडिओला आतापर्यंत ५० हजाराहून अधिक लाईक्स व कमेंट्स आल्या आहेत. यातील एका कमेंटमध्ये युजरने या भल्या मोठ्या नावाचा अर्थ इंग्रजीत भाषांतर करून सांगितला. त्याच्या मराठी अनुवादानुसार, साधारण अर्थ असा होतो की, हे, “देवांचे शहर, महान शहर, पन्ना बुद्धाचे निवासस्थान, देव इंद्राचे अभेद्य शहर (आयुथयाचे), नऊ मौल्यवान रत्नांनी संपन्न जगाची भव्य राजधानी, राजेशाही व राजमहालांनी वेढलेले आनंदी शहर” आहे. युजरने कमेंटमध्ये या भाषांतराचा स्रोत ब्रिटानिका.कॉम असल्याचे सुद्धा म्हटले आहे.
हे ही वाचा<< माघ पौर्णिमेला दिसणार ‘स्नो मून’; या पूर्ण चंद्राला भुकेचा चंद्र का म्हटलं जातं? नासाने दिलेलं उत्तर वाचा
तुम्हाला याबाबत माहिती होती का? हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन विषयांचे सामान्य ज्ञान मिळवण्यासाठी लोकसत्ता. कॉमच्या FYI पेजला आवर्जून भेट द्या.