आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना केली जाते. सर्व खात्यांचा हिशेब मार्च महिन्यातच केला जातो, त्यानंतर मग ती बंद केली जातात. त्यामुळेच रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयने दिल्या आहेत. ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये बंद(closing)चे काम केले जाते. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा उघडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या दिवशी बँकांमध्ये ग्राहकांसाठी कोणतेही काम केले जाणार नाही. मात्र, धनादेश (cheque) बँकेच्या शाखेत जमा करता येणार आहे. तसेच या दिवशी ऑनलाइन बँकिंगचे कामही सुरू राहणार आहे. ३१ मार्चनंतर १ आणि २ एप्रिलला सलग दोन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
RBI चे काय आहेत निर्देश ?
“सर्व एजन्सी बँकांनी ३१ मार्च २०२३ रोजी सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काऊंटर व्यवहारांसाठी त्यांच्या नियुक्त शाखा खुल्या ठेवाव्यात,” असे केंद्रीय बँकेच्या पत्रात म्हटले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) प्रणालीद्वारे ३१ मार्च २०२३ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहतील. तसेच ३१ मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी RBI चे डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम (DPSS) आवश्यक निर्देश जारी करेल.
ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी उरका
३१ मार्चपूर्वी आधार पॅनशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास १ एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. पंतप्रधान वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधीही याच दिवशी आहे. याशिवाय जर तुम्ही आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला ३१ मार्चपूर्वी आयटीआर भरावा लागेल, अन्यथा दंड ठोठावला जाणार आहे.