Belly Landing How plane lands in Emergency Situation : तमिळनाडूमधील त्रिचीवरून शारजाहला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट काही तांत्रिक समस्येमुळे (हायड्रॉलिक फेल्युअर) तब्बल दोन तास हवेतच घिरट्या घेत होती. दोन तासांच्या थरारानंतर हे विमान सुरक्षितपणे त्रिची विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडिया फ्लाइट नंबर AXB613 या विमानाने शुक्रवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी ५.४३ वाजता त्रिची विमानतळावरून उड्डाण केलं होतं. या विमानात १४१ प्रवासी होते. विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटात विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्यानंतर पायलटने विमान माघारी वळवलं. हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर काही वेळाने विमान त्रिची विमानतळाच्या धावपट्टीवर सुखरूप उतरवण्यात आलं. तत्पूर्वी, हे विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यासाठी बेली लॅन्डिंगची तयारी केली जात होती. मात्र, त्याची आवश्यकता भासली नाही. पायलटने विमान सुरक्षितपणे उतरवलं. दरम्यान, बेली लॅन्डिंगची आवश्यकता भासली नसली तरी हे बेली लॅन्डिंग म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत बेली लॅन्डिंग केलं जातं. यामध्ये विमान बेली म्हणजेच पोटाचा सहाय्याने उतरवलं जातं. अशा प्रकारच्या लॅन्डिंगवेळी पायलटला खूप काळजीपूर्वी विमान धावपट्टीवर उतरवावं लागतं.

बेली लॅन्डिंग ही एक इमर्जन्सी (आपत्कालीन) लॅन्डिंगची प्रक्रिया आहे. यामध्ये विमान लॅन्डिंग गिअर पूर्णपणे न वापरता जमिनीवर उतरवलं जातं. याला गिअर-अप-लॅन्डिंग देखील म्हटलं जातं. या स्थितीत विमानाचे लॅन्डिंग गिअर पूर्णपणे वापरले जात नाहीत, अथवा अंशिक रुपाने वापरले जातात. मुळात अशा लॅन्डिंगवेळी लॅन्डिंग गिअर ओपन करता येत नाहीत. यामध्ये विमान त्याच्या खालच्या बाजूने, म्हणजे बेलीच्या बाजूने (पोट) धावपट्टीवर उतरवलं जातं. लॅन्डिंग गिअर सिस्टिम खराब झाली तर बेली लॅन्डिंग पद्धतीचा वापर केला जातो.

बेली लॅन्डिंग केव्हा केलं जातं?

  1. लॅन्डिंग गिअर खऱाब झाले असतील, लॅन्डिंग सिस्टिम खराब झाली असेल तर नाईलाजाने पायलटला बेली लॅन्डिंगचा पर्याय स्वीकारावा लागतो.
  2. इलेक्ट्रिक किंवा हायड्रॉलिक फेल्युअर झाल्यास बेली लॅन्डिंग केलं जातं.
  3. युद्ध किंवा आपत्कालीन स्थितीत पायलट जाणीवपूर्वक बेली लॅन्डिंगचा पर्याय स्वीकारतात.

बेली लॅन्डिंग कसं केलं जातं?

बेली लॅन्डिंगदरम्यान, पायलट विमान खूप काळजीपूर्वी नियंत्रित करतो, जेणेकरून धिम्या गतीने आणि सुरक्षितपणे विमान धावपट्टीवर उतरवता येईल. विमान पोटाच्या बाजूने (बेली) रनवेला स्पर्श करतं. पायलट धावपट्टीचा अधिक वापर करतो. यामध्ये अनेक धोके असतात. या लॅन्डिंगवेळी विमानाच्या खालच्या बाजुला नुकसान होण्याची दाट शक्यता असते. परंतु, प्रवासी व क्रू सदस्यांच्या सुरक्षेला विमानापेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं.