वयवर्षे ५ पेक्षा लहान असलेल्या मुला-मुलींच्या ‘बाल आधारकार्ड’साठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे. युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) याबाबत मंगळवारी (२७ जुलै) असं सांगितलं आहे कि, “बाल आधारकरिता मुला-मुलीची नोंदणी करताना मुला-मुलीचं जन्म प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाची डिस्चार्ज स्लिप आणि एका पालकाचे आधार कार्ड इतकं पुरेसं आहे.” ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींसाठी देण्यात येणारं बाल आधार कार्ड हे निळ्या रंगांचं असणार आहे. मुख्य म्हणजे या बाल आधारकार्डसाठी बायोमेट्रिक तपशिलाची आवश्यकता असणार नाही. दरम्यान, जेव्हा मुल ५ वर्षांचं होईल तेव्हा मात्र हा बायोमेट्रिक तपशील अपडेट करणं अनिवार्य असेल. दरम्यान, ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, NREGS जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रं वापरली जाऊ शकतात. तर अॅड्रेस प्रूफ म्हणून पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रं वापरली जाऊ शकतात.
आपल्या मुलांची बाल आधार कार्डसाठी नोंदणी कशी कराल?
- बाल आधार नोंदणीसाठी UIDAI वेबसाईट ला भेट द्या आणि आधार कार्ड नोंदणी (Aadhaar Card Registration) पर्याय निवडा.
- पुढे आवश्यक तो तपशील भरा. उदा. तुमच्या मुला/मुलीचं नाव आणि इतर बायोमेट्रिक माहिती इ.
- निवासी पत्ता, परिसर, राज्य यासारख्या लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) तपशील भरा आणि सबमिट करा.
- आधार कार्डसाठी नोंदणीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी ‘अपॉईंटमेंट’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या जवळचं नोंदणी केंद्र निवडा. आपली ‘अपॉईंटमेंट’ (Appointment) निश्चित करा आणि दिलेल्या तारखेला तिथे जा.
- ओळखीचा पुरावा (POI), ऍड्रेस प्रूफ (POA), त्याचा पुरावा (POR), तसेच जन्मतारखेची सर्व कागदपत्रं/जन्माचा दाखला (DoB) अशी
- सर्व कागदपत्रं यावेळी तुमच्यासोबत घेऊन जा. तेथील संबंधित अधिकाऱ्यासोबत ही सर्व कागदपत्रं तपासून घ्या.
- तुमचं मुला/मुलीचं वय ५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास बायोमेट्रिक तपशील घेतला जाईल.
- तर ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक तपशीलाची आवश्यकता नाही. केवळ डेमोग्राफिक डेटा आणि चेहऱ्याची ओळख (फेशिअल रेकग्निशन) आवश्यक आहे.
- यावेळी पालकांना एक पावती क्रमांक दिला जाईल त्यामार्फत तुम्हाला आधारकार्डची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याची माहिती घेता येईल.
- त्यानंतर ६० दिवसांच्या आत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक एसएमएस येईल.
- ९० दिवसांच्या आत तुमच्या मुला-मुलीचं बाल आधारकार्ड तुमच्यापर्यंत पोहोचेल.