Why Bird Fly In V Shape: आकाशाकडे पाहिल्यावर आपल्याला नेहमी हवेमध्ये उडणारे पक्षी दिसत असतात. काही पक्षी स्वत:साठी, तर काही त्यांच्या पिल्लांसाठी खाद्य शोधत असतात. तर काही जोडीदाराचा शोध घेत असतात. संध्याकाळी अनेकदा आकाशामध्ये पक्षांचा थवा उडताना पाहायला मिळतो. जर नीट निरीक्षण केलं तर पक्षांचे थवे हे इंग्रजी भाषेतील ‘V’ अक्षरासारखे दिसतात हे तुमच्या लक्षात येईल. अशा वेळी पक्षी हवेत एकत्र उडत असताना व्ही आद्याक्षरामध्येच का उडतात असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत.
पक्ष्यांचा थवा उडताना V आकार का तयार करतो?
पक्ष्यांवर झालेल्या संशोधनानुसार, पक्षी हवेत उडताना त्यांच्या थव्याचा आकार व्ही आद्याक्षराप्रमाणे का दिसतो यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे या आकारामुळे थव्यातील प्रत्येक पक्षी हा व्यवस्थितपणे उडू शकतो. आपल्या समूहातील अन्य सदस्यांना तो आदळत नाही. दुसरं कारण हे समूहाच्या प्रमुखाशी निगडीत आहे. थव्यातील प्रमुख पक्षी हा सर्वात पुढे उडत दिशा ठरवत असतो. त्याच्यामागे बाकीचे पक्षी उडत असतात. प्रमुखाला फॉलो करता यावे यासाठी पक्षी ‘V’ आकारामध्ये उडत असतात. अनेक वैज्ञानिकांनी या दुसऱ्या कारणाशी सहमती दर्शवली आहे.
लंडन यूनिव्हर्सिटीमधील रॉयल वेटरनरी कॉलेजचे प्राध्यापक जेम्स उशरवुड यांनी यावर आपले मत मांडले आहे. या आकारामुळे हवेत एकत्र उडताना तोल सावरण्यासाठी मदत होते असे जेम्स यांनी म्हटले आहे. काही संशोधकांच्या मते, पक्ष्यांच्या समूहाच्या प्रमुखाव्यतिरिक्त अन्य सदस्यही थव्यात सर्वात पुढे उडू शकतात. काही पक्षांच्या प्रजातींमध्ये समूहाच्या प्रमुख पदावर सर्व सदस्यांचा समान अधिकार असतो. जो पक्षी सर्वप्रथम उडायला सुरुवात करतो, तो सर्वात पुढे राहतो आणि बाकीचे त्याच्यामागे जातात. जर थव्यात पुढे असलेला पक्षी थकला, तर त्याची जागा दुसरा पक्षी घेतो.