Who Gets Gun License, What Is The Process: उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघे बसले होते. जमिनीच्या वादावरून दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर झालेल्या गोळीबारामध्ये महेश आणि त्यांचा सहकाही राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या दोघांना ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीला महेश यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते मात्र आता त्यांच्या अवस्थेत सुधारणा होत असल्याचे समजतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाल्या घटनेला दुर्दैवी म्हणत महेश यांची हॉस्पिटलमध्ये भेट सुद्धा घेतली होती. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या ‘परवाना असलेल्या बंदुकी’ने शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांना ‘बंदुकीचा परवाना’ कसा मिळाला हा सुद्धा आता चर्चेतील विषय ठरला आहे.
बंदुकीचा परवाना कसा मिळतो? (How To Get Gun License)
बंदूक परवाना मिळविण्यासाठी सुरुवातीला पोलिसांच्या परवाना विभागाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर हा अर्ज संबंधित व्यक्ती वास्तव्यास असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात पाठिवला जातो. तिथे त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्या जिवाला कोणापासून धोका आहे का ? याची माहिती घेतली जाते. त्यानंतर हा अर्ज संबंधित क्षेत्राच्या उपायुक्त कार्यालयात पाठविला जातो. परवान्यासाठी शिक्कामोर्तब मिळाल्यानंतर तो अर्ज पुन्हा परवाना विभागात पाठविला जातो. त्यानंतर व्यक्तीला परवाना मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो. परवाना सुमारे पाच वर्षांसाठी असतो. त्याच्या नुतनीकरणासाठी पाच वर्षांतून केवळ २ हजार १०० रुपये इतका खर्च असतो.
बंदुक परवाना धारकांची आकडेवारी (Gun License Numbers)
सद्य आकडेवारी पाहता, आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत एकूण ४ हजार ३५० जणांना स्व-संरक्षणासाठी बंदूक परवाने दिले असून सर्वाधिक परवाने ठाणे शहरात देण्यात आले आहे. त्यांची संख्या १ हजार ९०० इतकी आहे. तर डोंबिवली आणि कल्याण शहरात १ हजार ३०० जणांना बंदूक परवाने देण्यात आले आहेत.
हे ही वाचा << Budget 2024: ९ कोटी महिलांनी लाभ घेतलेली लखपती दीदी योजना आहे काय? तुम्ही कसा घेऊ शकता फायदा?
बहुतांश परवाने राजकीय पक्षाशी निगडीत असलेले पदाधिकारी, बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे आहेत.मात्र अनेकजण बंदुकीचा वापर केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी करत असल्याचे लक्षात आले आहे ज्याला आळा घालण्यासाठी या परवान्यांच्या पडताळणीचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.