World’s Ugliest Animal : खोल समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक मासे, समुद्री जीव असतात. ते कधी त्यांच्या रंग, तर कधी आकार, आवाज यांमुळे, तर कधी ते काही त्यांच्यातील वेगळेपणामुळे ओळखले जातात. कधी कधी असे समुद्री जीव असे असतात की, जे आपणही पहिल्यांदा पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. त्यात जगात असा एक मासा आहे, जो त्याच्या कुरूप रूपामुळे ओळखला जातो. हा मासा त्याच्या कुरूप दिसण्यामुळे प्रसिद्ध आहे. २०१३ मध्ये या सागरी प्राण्याला ‘जगातील सर्वांत कुरूप मासा’ हा किताब देण्यात आला होता. पण, याच माशाला आता चक्क एका नामंकित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

जगातील सर्वांत कुरूप मासा म्हणून ‘ब्लॉबफिश’चे नाव घेतले जाते. ‘स्काय न्यूज’च्या वृत्तानुसार, न्यूझीलंडमधील एका पर्यावरण संघटनेने या माशाला ‘फिश ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

माउंटन टू सी कॉन्झर्वेशन नावाची ही संघटना न्यूझीलंडच्या वैविध्यपूर्ण सागरी आणि गोड्या पाण्यातील समुद्री जीवांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. त्यांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी ते दरवर्षी एक स्पर्धा आयोजित करतात. या वर्षी या स्पर्धेत ‘ब्लॉबफिश ५००० हून अधिक मते मिळाली आणि १३०० हून अधिक मतांनी ‘फिश ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. ‘ब्लॉबफिशच्या विजयातून असे सिद्ध झाले की, सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते.

‘ब्लॉबफिश’ सुमारे १२ इंच लांब मासा आहे, जो समुद्राच्या पृष्ठभागापासून ६०० ते १२०० मीटर खाली राहतो. सूर्यप्रकाशापासून हे अंतर फारच दूर आहे. समुद्रातील सर्वांत खोल भागात बहुतेक सागरी जीवसृष्टी जगू शकत नाही. अशा ठिकाणी हे मासे सहजपणे जगू शकतात. या माशाला प्रेमाने ‘मिस्टर ब्लॉबी’देखील म्हणतात. त्याचे डोके बुडबुड्याच्या आकाराचे आहे. तसेच, त्याची त्वचा सैल आणि हाडे मऊ आहेत. त्वचेचा पोत चिकट जिलेटिनस आहे. हा मासा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय किनाऱ्यावर टास्मानियाच्या ऑस्ट्रेलियन बेटावर आणि न्यूझीलंडमध्ये आढळतो.

जेव्हा हा मासा त्याच्या अधिवासात पोहोचतो, जिथे जास्त दाब असतो तेव्हा तो अगदी सामान्य माशासारखा दिसतो. पण, जेव्हा तो तुलनेने खूप कमी दाब असलेल्या पृष्ठभागाजवळ येतो तेव्हा तो त्याचे रूप गमावतो, यावेळी त्याची त्वचा सैल आणि मोठे झुकलेले नाक बुटासारखे दिसते, ज्यामुळे त्याला ‘ब्लॉबफिश’ असे नाव मिळाले

सहसा हे मासे नैसर्गिकरीत्या पृष्ठभागावर पोहत नाहीत. पण, काही वेळा मासेमारीच्या जाळ्यात ते चुकून अडकतात. पण- जेव्हा ती जाळे वेगाने वर काढले जाते तेव्हा दाब वाढल्याने ते मरण पावतात. मासेमारीची वाढती संख्या आणि खोल समुद्रातील ट्रॉलिंगमुळे ब्लॉबफिशची संख्या कमी होत आहे, ज्यामुळे माशाची ही प्रजाती एक धोक्यात आलेली प्रजाती बनली आहे.