Unmarried Couple In Hotel Raid: अमुक हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली आणि काही तरुण-तरुणींना अटक केली, अशा अनेक बातम्या रोज येत असतात. आजवर आपण अनेक चित्रपट, मालिकांमध्येही हे प्रकार पाहिले आहेत. अशा ठिकाणी सेक्स रॅकेट किंवा अन्य अवैध गोष्टी चालवल्या जात असल्याचा समज असतो, याच्याच तपासणीसाठी अनेकदा पोलीस अचानक धाड टाकतात. पण यामुळेच काही कपल्सना सुद्धा फिरायला जाताना हॉटेलमध्ये राहण्याची भीती वाटते. यासाठी आता काही हॉटेलमालकांनी कपल फ्रेंडली म्हणून जाहिरातीही सुरू केल्या आहेत पण तरीही अविवाहित कपल्सची चिंता काही मिटत नाही. म्हणूनच या संदर्भातील नेमके नियम काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
२०१९ मध्ये कोइम्बतूर जिल्हा प्रशासनाने एका अपार्टमेंटमध्ये अविवाहित जोडपे राहत असल्याने ती जागा जप्त केली होती. यावर मद्रास उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाची कानउघाडणी करीत, “अविवाहित जोडप्याने हॉटेलच्या खोलीत एकत्र राहणे बेकायदेशीर किंवा फौजदारी गुन्हा नाही, दोन प्रौढांमधील लिव्ह-इन रिलेशन हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही,”असे म्हटले होते.
हे ही वाचा<< भारतातील ‘हा’ एकमेव पूल जिथे ट्रेन व गाड्या एकत्र धावतात; रेल्वेने Video मधून प्रत्यक्ष दाखवला खास क्षण
अविवाहित जोडपे हॉटेलमध्ये राहू शकते का?
अविवाहित जोडप्याला देशातील हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी नाही, असा भारताच्या कोणत्याही कायद्यात कुठेही उल्लेख नाही. दरम्यान, वर नमूद केल्याप्रमाणे काही वेळा अशा ठिकाणी अवैध गोष्टी होण्याचा धोका टाळण्यासाठी हॉटेल व्यवस्थापक व मालक अविवाहित जोडप्यांना प्रवेश देणे टाळतात. देशात अशी असंख्य हॉटेल्स आहेत, जी अविवाहित जोडप्यांना एका खोलीत एकत्र राहू देत नाहीत. मात्र कायदेशीररीत्या वैध ओळखपत्र असल्यास १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे जोडपे हॉटेल रूममध्ये एकत्र राहू शकते. कोणत्याही कायद्याने हे प्रतिबंधित केलेले नाही आणि हा पूर्णपणे आवड व संमतीने घेण्याचा निर्णय आहे.