बापू बैलकर
भरधाव वाहनांचे अपघात ही एक गंभीर समस्या असून ती टाळण्यासाठी अलीकडे वाहनांमध्ये नवनवीन प्रणालींचा वापर करण्यात येत आहे. मात्र त्याबाबत सर्वानाच माहिती असते असे नाही. वेगावर नियंत्रण न मिळवता आल्यामुळे अपघातांचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी कार वा दुचाकींमध्ये एबीएस, ईबीडी व ब्रेक अॅसिस्ट या अतिशय महत्त्वाच्या प्रणाली वापरल्या जातात, त्या विषयी..
जानेवारी महिन्यात देशभरात ‘वाहतूक सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात आला. यात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. गेली अनेक वर्षे ती केली जात आहे. मात्र यामुळे अपघात थांबले आहेत का? तर नाही. प्रमाण एकवेळी कमी झाले असेल. त्यामुळे वाहतूक नियमांच्या जनजागृतीबरोबर वाहनांमध्ये वापरण्यात आलेल्या सुरक्षा साधनांविषयी प्रत्येकाला माहिती हवी. आपल्या वाहनात कोणत्या सुरक्षा प्रणाली आवश्यक आहेत, त्याचा वापर कधी व कसा होता आणि अपघातप्रसंगी त्या किती महत्त्वाच्या असतात, हेही तितकेच महत्त्वाचे असते.
अपघात होऊ नये म्हणून व अपघात झाल्यानंतर चालक व प्रवाशांची सुरक्षा डाळ्यासमोर ठेवून वाहनांत सुरक्षा साधनांचा वापर करण्यात येतो. गाडी खरेदी करताना आपण सुरक्षेविषयी सजग असतो. त्यामुळे गाडीत कोणत्या सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला आहे, याबाबत विचारणा करतो. यात प्राधान्याने एअर बॅग किती वापरल्या आहेत, यावर आपण गाडीची सुरक्षा ठरवत असतो. मात्र एअर बॅग ही अपघातानंतर आपला जीव वाचविण्यासाठी उपयोगी ठरते. मात्र यात वाहनाचे नुकसान तर होतेच, शिवाय चालक वा प्रवासी गंभीररीत्या जायबंदी होतात किंवा प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. त्यामुळे आपल्या वाहनात अपघात होऊच नये यासाठी कोणत्या सुरक्षा साधनांचा वापर असणे गरजेचे आहे, याची माहिती प्रत्येकाला हवी.
भारतातील रस्त्यांची रचना पाहता आपल्याकडे सरळ रस्त्यांबरोबर चढण व वळणाचे रस्तेही मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामळे सरळ रस्त्यावर भरधाव वेगावर नियंत्रण मिळवता न आल्यामुळे किंवा अचानक समोर एखादे वाहन किंवा अडथळा आल्यानंतर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जसे अधिक आहे, तसे चढ-उताराच्या व वळणदार रस्त्यावर गाडीवर नियंत्रण न मिळवता आल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही तेवढेच आहे. त्यामुळे हे अपघात टाळता यावेत व यात चालक व प्रवाशाचा जीव वाचावा यासाठी काही महत्त्वाच्या सुरक्षासाधनांचा वापर करण्यात येत असतो. त्यात एबीएस (एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम), ईबीडी (इलेक्टॉनिक ब्रेक फोर्स) व ब्रेक अॅसिस्ट या सुरक्षा प्रणालींचा वापर करण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून ‘एबीएस’ ही सुरक्षा प्रणाली वाहनांमध्ये वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अलीकडे येणाऱ्या वाहनांमध्ये ही प्रणाली वापरण्यात येते. मात्र सर्वच जण नवीन वाहने खरेदी करतात असे नाही. वापरलेल्या वाहन खरेदीचे प्रमाणही तेवढेच आहे. त्यामुळे आपण खरेदी करीत असलेल्या वाहनांमध्ये या सुरक्षाप्रणाली आहेत का? हे खरेदीपूर्वी प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. आता प्रश्न निर्माण होतो की, खरंच या सुरक्षा प्रणाली वाहनांत असणे गरजेचे आहे? तर होय, कारण चालक व प्रवाशांचा जीव हा महत्त्वाचा असल्याने थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल पण या सुरक्षा साधनांचा वापर असलेली वाहनेच खरेदी करणे आवश्यक आहे.
एबीएस (एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम)
अलीकडे वाहनांमध्ये वेगाची स्पर्धा लागलेली दिसते. दुचाकी असो की कार नवी पिढीतील चालक हे वेगाशी स्पर्धा करताना दिसतात. मात्र भरधाव वेगात काही अपघात हे वाहन घसरल्यामुळे होतात, तर काही अपघात वाहनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे वाहन पलटी होते व अपघात होतो. तर काही प्रसंगी भरधाव वाहन असताना समारे दुसरे वाहन येते किंवा अडथळा येता आणि अचानक नियंत्रण मिळविण्याच्या नादात अपघात होता. हे सर्व अपघात चालकाचे ब्रेकवर नियंत्रण सुटते व वाहनावरचे नियंत्रण सुटते व अपघात होतात. यात ही ‘एबीएस’ सुरक्षा प्रणाली अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते. आशा प्रसंगी चालक अचानक ब्रेक दाबतो आणि त्या वाहनाची चाके लॉक होतात व सुकानूही लॉक होतो. आणि वाहन घसरत जाऊन समोरील वाहनांवर, खड्डय़ात किंवा भिंतीवर जाऊन धडकते. वाहनांची ब्रेकिंग प्रणाली ही हायड्रॉलिक असते व ती ऑइलवर चालते. जर त्या वाहनात ‘एबीएस’ असेल तर ज्या दाबाने ब्रेक दाबला जातो, तो दाब ऑइलच्या साहाय्याने सर्वच चाकांमध्ये समप्रमाणात विभागला जातो. त्यामुळे वाहनाची चाके लॉक होत नाहीत. त्यामुळे सुकानूही लॉक होत नसल्यामुळे चालक धोकादायक स्थळापासून काही अंतर मागे वाहन थांबविण्यात यशस्वी होतो आणि अपघात टळतो. ही प्रणाली यातील महत्त्वाची सुरक्षा प्रणाली मानली जाते. शासनाने ती १५० सीसीपेक्षा अधिक वजन असलेल्या वाहनांमध्ये २०१९ नंतर बंधनकारक केली आहे.
‘एबीएस’चे फायदे
अपघातावेळी सुकाणू सहजपणे नियंत्रित करू शकते
अपघात होण्यापूर्वी आपले वाहन नियंत्रित करू शकता
आपले वाहन घसरण्याची शक्यता कमी असते
ब्रेक आपल्या नियंत्रणाखाली असतील
अपघातादरम्यान ब्रेक दाबल्यास वाहनाची चाके कधीही लॉक होणार नाहीत.
ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स)
वाहन चालवताना चालकाने अचानक वेग घेतला तर चालक व प्रवाशांचा भार मागील दिशेला जास्त पडतो. चालकाने अचानक ब्रेक दाबला तर वाहनातील भार पुढील दिशेला जातो. तर वळण रस्त्यावर वाहनातील भार एका बाजूला जातो. हा भार ज्या चाकांवर जास्त जातो, त्या दिशेने वाहन पलटी होण्याची शक्यता असते. आशा वेळी जर त्या वाहनात ‘ईबीडी’ या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आलेला असेल तर ही प्रणाली ज्या चाकांवर भार जास्त जातो, तो भार इतर चाकांमध्ये समप्रमाणात विभागण्यात मदत करते. त्यामुळे वाहनावरचे चालकाचे नियंत्रण सुटत नाही व अपघात टळतो.
ब्रेक अॅसिस्ट
हे सुरक्षा साधन असलेच पाहिजे असे नाही. मात्र नवीन चालक असेल तर यामुळे पुढील धाके टळतात. नवीन चालक असेल तर त्याला कोणत्या परिस्थितीत किती दाबाने ब्रेक दाबायचा हे कळत नाही. समोर आलेल्या परिस्थितीमुळे तो गडबडून जातो व कधी जास्त दाबाने ब्रेक दाबला जातो तर कधी ब्रेक आवश्यक प्रमाणात दाबला जात नाही. या दोन्ही परिस्थितीत अपघ्0ााताची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत जर त्या वाहनात ब्रेक अॅसिस्ट असेल तर तो किती दाबाने ब्रेक दाबला व कोणत्या वेगात दाबला त्या परिस्थितीत आवश्यक प्रमाणात समतोल साधण्यासाठी मदत करते आणि अपघात टळतो.