भारत हा धार्मिक श्रद्धा आणि परंपरा मानणारा देश आहे. आपल्या इथे झाडांपासून ते पर्वत, नद्या आणि इतर प्रत्येक गोष्टीची पूजा केली जाते. याचा भारतीयांच्या जीवनाशी गहन संबंध जोडलेला आहे. भारतात लोकं त्यांच्या देवतेची तसेच त्यांच्या वाहनाची पूजा करतात. गणपती सोबत त्यांचे वाहन उंदीर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उंदराची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी घुबडाची देखील पूजा केली जाते. दुर्गा माताचे वाहन सिंह आहे. त्यामुळे मंदिरात सिंहाची देखील पूजा केली जाते.
भारतातील ‘या’ मंदिरात केली जाते मांजरीची पूजा
भारतीय प्रथेनुसार काही प्राण्यांना अशुभ मानले जाते. यातील एक प्राणी म्हणजे मांजर आहे. रस्त्यावरून मांजर आडवी गेली की अजूनही हा अशुभ संकेत असल्याचे समजले जाते. पण भारतात चक्क एका ठिकाणी मांजराची पूजा केली जाते. होय, हे खरंय. भारतात मांजरीचेही मंदिर आहे. भारतात एका ठिकाणी मांजराचं मंदिर असून येथे हजारो काळापासून पूजा केली जाते.
१००० वर्षांपासून मांजरीची पूजा केली जाते
भारतातील कर्नाटक मध्ये हे मांजरीचं मंदिर आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात हे ठिकाण आहे. येथे बेक्कालेले नावाचे गाव आहे. या गावातील लोक गेल्या १००० वर्षांपासून चक्क मांजरीची पूजा करतात. या गावात राहणारी लोकं मांजर हा देवीचा अवतार आहे असं मानतात. त्यामुळे या गावात मांजरीची विधीपूर्वक पूजा केली जाते. खरं तर या गावातील लोक मांजरांना मंगम्मा देवीचे रूप मानतात.
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात लहान देश; राहतात फक्त ८०० लोकं)
मांजरींना देवीचे रूप मानतात
बेक्काले गावातील हे मंदिर गेल्या १००० वर्षांपासून तसेच आहे. येथे आजही मांजरीची पूजा केली जाते. गावातील लोक मंगम्मा देवीला आपली कुलदेवी मानतात. यामुळेच जर कोणी गावातील मांजरांना इजा केली तर त्यांना त्यांना गावातून हाकलून दिले जाते. या गावात एखादे मांजर मेले तरी पूर्ण विधीपूर्वक दफन केले जाते.
१००० वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा कशी सुरू झाली?
गावातील लोक सांगतात की शेकडो वर्षांपूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तींनी हैराण झाले होते. जेव्हा दुष्ट शक्तींचा प्रकोप झाला तेव्हा माता देवी मंगम्माने मांजरीचे रूप धारण केले आणि गावातून वाईट शक्तींचा नाश केला. नंतर देवी मंगम्मा या गावातून अचानक गायब झाल्यावर त्यांनी इथल्या एका ठिकाणी छाप सोडली. त्याच ठिकाणी नंतर त्यांचे मंदिर बांधण्यात आले आणि तेव्हापासून लोक येथे मांजरींची पूजा करतात.