उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबादमध्ये एका कॉलनीत सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अधिक तीन जण जखमी झाले; ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात दोन मजली घरदेखील कोसळले आहे. घरगुती सिलिंडर स्फोटाच्या अनेक बातम्या वारंवार येत असतात. त्यामुळे हे स्फोट नक्की कशामुळे होतात, असा प्रश्न उपस्थित होतो. सिलिंडरचा स्फोट होण्यामागील नेमकी कारणे काय? स्फोटाच्या घटना का वाढत आहेत? काय काळजी घ्यावी? त्याविषयी जाणून घेऊ.
सिलिंडरचा स्फोट होण्यामागील कारणे काय?
स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) केवळ घरे आणि हॉटेल्सचा भाग नाही, तर तो रस्त्यावरील भोजनालये, कारखाने, मॉल्स व कॅन्टीन असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सर्वव्यापी आहे. अनेकांना गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराविषयी माहिती नसल्यामुळेदेखील अशा घटना घडतात. चुकीच्या पद्धतीने उपकरणे लावण्यात येणे किंवा खराब झालेली उपकरणे बसविणे यांमुळेदेखील अनेकदा घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट होतो. एलपीजी सिलिंडर सतत प्रचंड उष्णतेच्या किंवा आगीच्या संपर्कात राहिल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो.
त्यासह स्फोटाचे प्रमुख कारण म्हणजे सिलिंडरच्या रेग्युलेटरमधून गॅस गळती होते आणि हा गॅस हवेत मिसळून ज्वलनशील मिश्रण तयार करतो. त्यामुळे स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट होत असल्याचे लक्षात आले आहे. आगीची एक ठिणगी ज्वलनशील एलपीजी व हवेचे मिश्रण प्रज्वलित करते आणि त्यामुळे स्फोट होतो. असे स्फोट सामान्यतः लोक जेव्हा सावध नसतात तेव्हा होतात.
उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. एलपीजी सिलिंडर हाताळताना सुरक्षा उपायांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मुख्यतः निष्काळजीपणामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होतो. प्रभावी सुरक्षा उपायांचा अवलंब केल्यास असे अपघात टाळण्यास मदत होईल. गॅस सिलिंडर नेहमी मोकळ्या जागेत आणि जिथे थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क येणार नाही, अशा ठिकाणी ठेवावा. सिलिंडरला उष्णतेच्या स्रोतांपासून, ज्वलनशील पदार्थांपासून, इलेक्ट्रिक सॉकेट्सपासून दूर ठेवावे.
हेही वाचा : मोमोज, डिम सम आणि डंपलिंगमध्ये नेमका काय फरक असतो?
काय काळजी घ्यावी?
- गॅसचे नॉब कधीही सुरू ठेवू नका. रेग्युलेटर नॉब वापरात नसताना बंद असावा.
- एलपीजी सिलिंडरजवळ ज्वलनशील वस्तू, प्लास्टिक आणि इतर रद्दी कधीही ठेवू नका.
- सिलिंडर विद्युत उपकरणांपासून दूर ठेवा.
- स्वयंपाकघर/स्वयंपाकाची जागा हवेशीर असावी.
- रबर ट्युब आणि रेग्युलेटर आयएसआय मान्यताप्राप्त असावेत
- नेहमी अधिकृत फ्रँचायजींकडून एलपीजी सिलिंडर घ्या.
- मुलांना एलपीजी सिलिंडरवर चालणारे स्टोव्ह/बर्नर हाताळण्यास देऊ नका
- अग्निशामक (फायर एक्स्टिंग्युशर) सहज मिळेल अशा जागी ठेवा आणि त्याचा वापर कसा करावा याबाबतची माहिती जाणून घ्या.