केंद्रीय तपास यंत्रणेकडून जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार आणि सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी असलेले प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उजेडात येताच प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर करून जर्मनीला पसार झाले होते. आता त्यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाऊ शकते. रेवण्णा यांचे प्रकरण देशभरात गाजत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील, माजी मंत्री, आमदार एचडी रेवण्णा या दोघांनाही लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी मानन्यात येत आहे. २८ एप्रिल रोजी २,९६७ व्हिडीओ असलेली पेन ड्राईव्ह बाहेर आल्यानंतर होलेनारसिपुरा शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका ४७ वर्षीय महिलेने प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील आमदार एचडी रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. आता ब्लू कॉर्नर नोटीसमुळे देशाबाहेर पळ काढलेल्या प्रज्ज्वल रेवण्णाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना’ म्हणजे ‘इंटरपोल’ ही संस्था काम करत असते. या संस्थेतर्फे ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाते. देशाबाहेर पळालेल्या एखाद्या व्यक्तीची चौकशी करायची असल्यास ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस काढली जाते. ही नोटीस जारी केल्यानंतर संबंधित देशाच्या पोलिसांना यासंदर्भातील माहिती इंटरपोलला देणे बंधनकारक असते. या माहितीमध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, त्याचा गुन्हेगारी अहवाल, पत्ता इत्यादींचा समावेश असतो. याआधी इंटरपोलने बाबा नित्यानंद विरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती.
इंटरपोल संस्था म्हणजे काय?
इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय संस्था असून जगातील १९५ देश या संघटनेचे सदस्य आहेत. १९२३ साली इंटरपोलची स्थापना करण्यात आली होती. भारत १९४९ मध्ये या संस्थेचा सदस्य झाला. प्रत्येक देशातील काही पोलीस अधिकाऱ्यांना इंटरपोल या संस्थेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. इंटरपोलचे सदस्य असलेले देश एकमेकांच्या देशात पळालेल्या गुन्हेगारांविरोधात नोटीस जारी करू शकतात.
लुकआऊट नोटीस म्हणजे काय? रेवण्णा बाप लेकांना ती का बजावली?
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले की, आमदार एचडी रेवण्णा यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. आपल्या मुलाप्रमाणेच एचडी रेवण्णाही पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस बजावली गेली. फरार व्यक्तीचा माग काढण्यासाठी लुकआऊट नोटीस बजावली जाते. देशाबाहेर पळालेला व्यक्ती कुठे प्रवास करतोय, याचा शोध यातून लागण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय सीमांवर इमिग्रेशन प्रक्रिये दरम्यान नोटीस बजावलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली जाते.
२६ एप्रिल रोजी कर्नाटकात पहिल्या टप्प्याचे मतदान उरकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रज्ज्वल रेवण्णा देशाबाहेर पसार झाले. रेवण्णा यांच्या वकिलाने विशेष तपास पथकाकडून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सात दिवसांची मुदत मागण्यात आली होती. मात्र कायद्यात अशी तरतूद नसल्याने एसआयटीने ही मागमी फेटाळून लावली.