CEO Spends 16 Crore To Look Like 18 Year Old: तरुण दिसण्यासाठी माणसाची धडपड काही नवीन नाही. पण या हट्टापायी काहीजण असं काहीतरी करून बसतात की त्यावर विश्वासही ठेवता येत नाही. आपण आज कॅलिफोर्निया स्थित एका उद्योजकाच्या तरुण दिसण्याच्या वेडाविषयी जाणून घेणार आहोत. या व्यक्तीचे नाव आहे ब्रायन जॉन्सन व ते लॉस एंजेलिसस्थित न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी कर्नलचे सीईओ आहेत, त्यांचे वय आहे ४५ वर्ष. पण मागील कित्येक वर्षांपासून जॉन्सन हे चक्क एका १८ वर्षाच्या तरुणासारखे दिसत आहेत. याचे कारण केवळ जीन्स किंवा त्यांची जीवनशैली नसून त्यासाठी ते दरवर्षी चक्क १६ कोटी रुपये खर्च करतात.
ब्रायन जॉन्सनने १८ वर्षांच्या मुलाचे मेंदू, हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, स्नायुबंध, दात, त्वचा, केस आणि इतर अवयवांसह सुदृढ शरीर असण्याचे ध्येय ठेवून ३० वैद्यकीय तज्ञांची टीम तयार केली आहे. या योजनेचे नाव ‘प्रोजेक्ट ब्लूप्रिंट’ असे आहे.
वय थांबवण्यासाठी जॉन्सन यांचे रुटीन काय आहे?
- जॉन्सन हे दिवसाला १९७७ कॅलरीज असलेला शाकाहारी आहार
- आठवड्यातून तीन वेळा उच्च-तीव्रतेचा व्यायाम
- झोपण्यापूर्वी दोन तास निळा प्रकाश रोखणारा चष्मा घालून राहणे हे त्यांच्या दिवसाचे रुटीन आहे.
- जॉन्सन पहाटे ५ वाजता दोन डझन सप्लिमेंट्स आणि औषधे, क्रिएटिन आणि कोलेजन पेप्टाइड्ससह घेऊन दिवसाची सुरुवात करतात.
- शरीरातील फॅट्स , हार्टबीट्स व रक्तातील ग्लुकोजच्या पातळीची तपासणी केली जाते.
- दात घासताना टी-ट्री ऑइल पुलिंग आणि अँटीऑक्सिडंट जेल लावले जाते.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,प्रत्येक महिन्याला,जॉन्सन डझनभर वैद्यकीय प्रक्रिया देखील करून घेतात यातील काही अत्यंत वेदनादायक असतात. याशिवाय वेळावेळी अतिरिक्त रक्त चाचण्या, एमआरआय, अल्ट्रासाऊंड आणि कोलोनोस्कोपी सुद्धा केली जाते.
जॉन्सन यांचे वय खरच कमी झाले आहे का?
जॉन्सनने दावा केला आहे की त्याच्या या रुटीनचे सकारात्मक परिणाम होत आहेत. ट्विटरवरील पोस्ट नुसार, त्याने ५. १ वर्षांचे एपिजेनेटिक वय उलटले आहे आणि त्याच्या वृद्धत्वाचा वेग २४ टक्क्यांनी कमी केला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जॉन्सनचे वय आता ४५ असूनही त्याचे हृदय ३७ वर्षीय, त्वचा २८ वर्षीय फुफ्फुसाची क्षमता १८ वर्षीय आणि दातांचे आरोग्य १७ वर्षीय व्यक्तीप्रमाणे आहे.
वय थांबवता येऊ शकते का? डॉक्टर सांगतात..
डॉ. दिलीप गुडे, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांच्या मते, वृद्धत्वविरोधी या प्रमाणाची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे-आधारित औषध नाही. स्टेम सेल थेरपी आणि जीन थेरपी या काही उपचार पद्धती आहेत ज्या वृद्धत्वाचा वेग कमी करण्यात काहीश्या परिणामकारक ठरतात. जगभरात कॅलरी निर्बंध हे दीर्घायुष्य वाढवण्यात मदत करत असल्याचे दिसून आले आहे.
डॉ सुहास एसएम सल्लागार, प्लास्टिक सर्जरी, फोर्टिस हॉस्पिटल यांनी सांगितले की, जॉन्सन यांनी ज्याप्रकारे वय कमी दिसण्याचा प्रयत्न केला आहे तो अभ्यासाचा विषय नक्कीच आहे पण सध्या असे करणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. मुळात परिस्थितीनुसार तुम्हाला इतके क्लिष्ट रुटीन फॉलो करायला मिळेल असेल नाही आणि त्यामुळे चिडचिड होऊन मानसिक ताण वाढू शकतो. याशिवाय आपल्या शारीरिक क्षमतेवर ताण दिल्यास शरीराच्या अवयवांवर आणि सामान्य आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.