लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी महाभारत चक्रव्यूह यावरुन मोदी सरकारवर टीका केली. ज्यानंतर भाजपा खासदार शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तरही दिलं. चक्रव्यूह ही महाभारतातली युद्धरचना होती. मात्र या युद्धरचनेचे जनक कोण? किती जणांना चक्रव्यूह ( Chakravyuh ) भेदता येत होता हे तुम्हाला माहीत आहे का? तसंच राहुल गांधी काय म्हणाले होते ते देखील जाणून घेऊ.
राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधींनी शेतकरी, युवा, महिला, कामगार, लघु-उद्याोजक, दलित-आदिवासी, ओबीसींची तुलना अभिमन्यूशी केली. महाभारतात ज्याप्रमाणे सहा जणांनी अभिमन्यूची हत्या केली, त्याचप्रमाणे आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या सहा जणांनी हा आधुनिक चक्रव्यूह ( Chakravyuh ) रचला आहे, आरोप गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या याच वक्तव्यामुळे चक्रव्यूह चर्चेत आहे. महाभारतातील चक्रव्युहाची ( Chakravyuh ) रचना कुणी केली आपण जाणून घेऊ.
चक्रव्यूह कुणी रचला होता?
महाभारतातील उल्लेखाप्रमाणे चक्रव्यूह ( Chakravyuh ) ही युद्धरचना द्रोणाचार्यांनी केली होती. भीष्म पितामह जेव्हा शरपंजरी पडले तेव्हा द्रोणाचार्य कौरवसेनेचे सेनापती झाले. त्यावेळी त्यांनी युद्धात चक्रव्यूह ही रचना वापरली होती. या चक्रव्युहात सापडणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. या चक्रव्युहाची रचना सात थरांमध्ये करण्यात आली होती. अर्जुनाचा पराभव करणं आणि धर्मराज युधिष्ठीर यास बंदी बनवण्यासाठी हा चक्रव्यूह रचण्यात आला होता. मात्र या चक्रव्यूहात अभिमन्यू मारला गेला.
हे पण वाचा- राहुल गांधींकडून सद्य राजकारणाला चक्रव्यूहाची उपमा; काय आहे महाभारतातील चक्रव्यूह नि अभिमन्यूचा पराक्रम?
महाभारतात चक्रव्यूह भेद कुणाला ठाऊक होता?
महाभारतात चक्रव्यूह ( Chakravyuh ) भेद करण्याचं तंत्र हे द्रोणाचार्य, श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म आणि अभिमन्यू यांनाच ठाऊक होतं. मात्र यात अभिमन्यू हा अपवाद ठरतो कारण त्याला चक्रव्युहात कसं शिरायचं हे माहीत होतं. पण चक्रव्युहातून सुखरुप बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं.
चक्रव्युहात अडकून मारला गेलेला अभिमन्यू कोण होता?
चक्रव्युहात ( Chakravyuh ) अडकून मारला गेलेला अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र होता. सुभद्रेच्या गर्भात अभिमन्यू असतानाच श्रीकृष्णाने त्याला चक्रव्युहात शिरायचं कसं हे शिकवलं होतं असं सांगितलं जातं. ‘श्री कृष्णेन सुभद्राये गर्भवत्येनिरुपितम चक्रव्युह प्रवेशस्य रहस्यं चातुदम्भितत अभिमन्यु स्तिथो गर्भे द्विवेद्यनानयुतो श्रुणो रहस्यं चक्रव्यूहस्य सम्पूर्णम असत्यात्वा’ गीतेतला हा श्लोक हेच सांगतो की अभिमन्यूला श्रीकृष्णामुळे सुभद्रेच्या गर्भात असतानाच चक्रव्युहाचं रहस्य समजलं होतं. याबाबत असंही सांगितलं जातं की चक्रव्युहाचा भेदून बाहेर कसं यायचं हेदेखील कृष्णाने सुभद्रेला सांगितलं होतं. मात्र त्या वेळेस तिला झोप लागली. त्यामुळे पोटात असलेल्या अभिमन्यूला जे दिव्यज्ञान मिळालं ते फक्त चक्रव्युहात कसं शिरायचं इतकंच होतं.
चक्रव्युहाची रचना नेमकी कशी होती?
समोरुन पाहिलं असता या चक्रव्युहाचा आकार लक्षात येत नाही. मात्र आकाशातून पाहिलं तर हा चक्रव्यूह सात पाकळ्यांच्या फुलाप्रमाणे दिसतो. पाकळ्या जशा एकमेकांशी संलग्न असतात आणि त्यांचा आकार निमुळता असतो तशीच या चक्रव्युहाची रचना होती. या वर्तुळाकार चक्रव्युहात अश्वदळ, गजदळ, पायदळ अशा रांगा असतात. परीघावर चतुरंग सेना असते आणि मध्यभागी सेनापती असतो. जो योद्धा चक्रव्युहाचा भेद करतो त्याची दमछाक होऊ शकते इतके योद्धे यात असतात. तसंच पहिल्या फळीपासून सेनापतीपर्यंत पोहचेपर्यंत प्रचंड संघर्ष करावा लागतो. अभिमन्यू शेवटच्या फळीपर्यंत पोहचला होता. मात्र त्याला बाहेर पडता आलं नाही त्यामुळे तो मारला गेला.