Chandrayaan-3 Landing:  आज संपूर्ण जगाचे लक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या इस्रोच्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगकडे लागले आहे. आजचा दिवस भारतीय खगोलशास्त्राच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण- चांद्रयान-३ चे लँडिंग यशस्वी झाले, तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर व रोव्हर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवतील. याबाबत इस्रोने माहिती दिली की, सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. कुठेही अडचण नाही. चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग इस्रो आणि भारतासाठी आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे यापूर्वी चांद्रयान-२ चे क्रॅश लँडिंग झाले होते. मात्र, आता चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग होणार असल्याचा दावा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केला आहे आणि त्यासाठी सर्व पर्यायांवर काम केले जात आहे. पण, चांद्रयान-३ च्या लँडिंगसाठी २३ तारीखच का निवडण्यात आली; ते आपण जाणून घेऊ …

Chandrayaan 3 Landing Live : भारताच्या चांद्रयान मोहिमकडे संपूर्ण देशाचं लक्ष, इस्रोने व्यक्त केला ‘हा’ विश्वास

का निवडली २३ ऑगस्ट ही तारीख?

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चांद्रयान-३ मधील लँडर व रोव्हर सूर्यप्रकाशाचा वापर करतील; जे त्यांच्या इक्विपमेंट्सना चार्ज राहण्यासाठी आवश्यक आहे. चंद्रावर १४ दिवस सूर्यप्रकाश आणि पुढील १४ दिवस काळोख अर्थात रात्र असते; यात दिवसा खूप उष्णता आणि रात्री खूप थंड वातावरण असते. दक्षिण ध्रुवावर तापमान उणे २३० अंशांवर जाते. त्यामुळे चांद्रयान अशा वेळी चंद्रावर उतरेल, जेव्हा १४ दिवस सूर्यप्रकाश असेल.

इस्रोने लँडर आणि रोव्हरसाठी २३ ऑगस्टचा दिवस निवडला आहे. कारण- चंद्रावरील १४ दिवसांचा रात्रीचा कालावधी २२ ऑगस्ट रोजी संपत आहे आणि २३ ऑगस्टपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असणार आहे. आजपासून म्हणजेच २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश असेल; ज्याच्या मदतीने चांद्रयानाचे रोव्हर चार्ज होत राहील आणि ते आपले मिशन यशस्वीपणे पूर्ण करू शकेल.

चंद्रावरील सर्वांत मोठे रहस्य होणार उघड?

शतकानुशतकांपासून प्रत्येकाच्या मनात चंद्राबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अगदी लहानपणापासूनच चंद्राबद्दल प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जेव्हापासून चंद्रावर जीवसृष्टी शक्य आहे हे कळले तेव्हापासून चंद्राबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. जगभरातील अंतराळ शास्त्रज्ञही चंद्राबाबत जास्तीत जास्त शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रशिया-अमेरिका चंद्रावर पोहोचले असले तरी चंद्राचे मोठे गूढ उकलण्यात अद्याप त्यांना यश आलेले नाही. चंद्रावर माणसाची जगण्याची शक्यता आहे का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. अमेरिका-रशियाबरोबरच चीनचे अवकाशयानही चंद्रावर उतरले; पण चंद्राचे कोडे सुटू शकलेले नाही. याआधी भारताचे चांद्रयान-२ देखील लँडिंगदरम्यान अयशस्वी ठरले होते; परंतु भारताच्या मोहिमेमुळे चंद्रावर पाणी असल्याचे जगाला प्रथमच कळले.

चंद्रावर जीवन शक्य आहे …; चांद्रयान-३ मधून उलगडणार अनेक प्रश्नांची उत्तरे

चंद्राबाबत गेल्या वर्षी नासाचे मोठे शास्त्रज्ञ हॉवर्ड हू यांनी दावा केला होता की,मानव २०३० वर्षापूर्वी चंद्रावर राहू शकतो; ज्यावर त्यांच्या राहण्यासाठी वसाहती असतील आणि त्यांच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी रोव्हर असतील. मानवाला चंद्राच्या भूमीवर पाठवले जाईल; ते तेथे राहतील, काम करतील आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेतील. पण आता भारताचे चांद्रयान-३ अशा दाव्यांची आणि अशा सर्व न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश असेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 landing date why isro decide 23 august what will happen after chandrayaan 3 land on moon what happens if chandrayaan 3 is successful sjr
Show comments