चॅट जीपीटीच्या ‘घिबली’ने सध्या संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. ‘घिबली’मुळे चर्चेत असलेले चॅट जीपीटी आता बनावटी आधार कार्डमुळे चर्चेत आले आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोक चॅट जीपीटीवर खोटे आधार कार्ड तयार करताना दिसत आहेत. आधार कार्ड हा भारत सरकारद्वारे जारी केलेला तुमच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. मात्र, अशा चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड तयार केले जात असल्याने सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. चॅट जीपीटीतील ‘घिबली’च्या नवोन्मेषी शोधामुळे सुरक्षाविषयक चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी भारत सरकारने केली गेलेली सोय आहे आणि त्यासाठी त्या त्या प्रत्येक व्यक्तीला १२ अंकी ‘युनिक आयडेंटिटी’ क्रमांक प्रदान केला जातो. भारतातील मुले आणि नवजात बालकांनाही आता हा नंबर दिला जातो. सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक माहितीच्या आधारे प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा आयडी क्रमांक तयार होतो आणि हाच त्याचा ‘युनिक आधार आयडी नंबर’ असतो. तुमच्याजवळचे आधार कार्ड खरे आहे की खोटे ते कसे ओळखायचे? जाणून घेऊ…
एआय-जनरेटेड आधार आणि खऱ्या आधार कार्डामधील फरक
खऱ्या आणि खोट्या आधार कार्डमधील फरक समजून घेण्यासाठी चॅट जीपीटीने तयार केलेल्या आधार कार्डचे छायाचित्र आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय)ने शेअर केलेल्या आधार कार्डावरील छायाचित्र बघून, त्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. या दोन्हींमधील फरक पाहू…
१. आयडीवरील पासपोर्ट-आकाराची प्रतिमा तपासणे. एआय-जनरेटेड प्रतिमा, अपलोड केलेल्या / खऱ्या प्रतिमेवरून घेतलेल्या प्रतिमादेखील वेगवेगळ्या असू शकतात. चॅट जीपीटीवर आधार कार्ड तयार करण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते की, बनावट आयडीवरील प्रतिमा अपलोड केलेल्यापेक्षा प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात.
२. खरे आधार कार्ड आणि बनावट आधार कार्डावरील हिंदी/इंग्रजी फॉन्टची तुलना करा.
३. वाक्यरचना तपासा. जसे की, आधारची रचना कशी केली गेली आहे. त्यामध्ये कोलन, स्लॅश व स्वल्पविराम यांचा वापर कसा केला गेला आहे.
४. बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी ते आधार कार्ड आणि त्यावरील भारत सरकारचे लोगो काळजीपूर्वक तपासा.
५. आधार कार्डवर क्युआर कोड आहे का ते तपासा.जर त्यावर क्युआर कोड असेल, तर तो कोड खरा आहे का ते तपासण्यासाठी स्कॅन करा.
‘यूआयडीएआय’ वेबसाइटवर आधार कार्ड कसे तपासायचे?
तुम्ही https://uidai.gov.in/ किंवा https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar या वेबसाइटवर जाऊन आधार कार्डाची ऑनलाइन पडताळणी करू शकता.
१. सर्वप्रथम तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर जा.
२. ‘आधार वैधता तपासा’ या पर्यायावर वर क्लिक करा — https://myaadhaar.uidai.gov.in/check-aadhaar-validity/en
३. त्या पर्यायात १२-अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
जर आधार क्रमांक बनावट असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रिया करणे शक्य होणार नाही आणि वेबसाइटकडून तुम्हाला वैध आधार क्रमांक टाकण्याची सूचना मिळेल. कारण- त्यात वैध आधार क्रमांक टाकल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता. या टप्प्यावरून पुढे गेल्यास, तुम्हाला ‘एंटर केलेला आधार क्रमांक अस्तित्वात आहे, आधार पडताळणी पूर्ण झाली’ अशा स्वरूपाचे पान दिसेल.
४. या स्क्रीनवर आलेली वैयक्तिक माहिती तुमच्याकडच्या आधार कार्डवरील माहितीशी जुळवून पाहा; जसे की, नाव, राज्य, इत्यादी.