‘छावा’ चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, त्यामध्ये विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी राजांच्या शौर्य आणि पराक्रमाची एक झलक पाहायला मिळत आहे. पण, त्यांची एक गोष्ट आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का एक असा पदार्थ आहे, ज्याचे नाव छत्रपती संभाजी राजे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे हा पदार्थ महाराष्ट्रातील नसून तो दाक्षिणात्य पदार्थ आहे.
जगभरातील खवय्यांना आपल्या चवीची भुरळ पाडणाऱ्या या सांबाराची ओळख जरी दाक्षिणात्य पदार्थ अशी असली, तरी या पदार्थाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. सांबार हा दाक्षिणात्य भारतीय खाद्यपदार्थ असला तरी त्याचे मूळ हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जोडलेले आहे. चला जाणून घेऊ या सविस्तर…
सांबार पहिल्यांदा कधी तयार केलं गेलं या संदर्भात अनेक कथा आहेत. सांबार हा पदार्थ पहिल्यांदा मराठ्यांच्या राजवटीमध्ये बनवण्यात आला होता, अशी माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी लाइफस्टाइल वाहिनीवरील ‘करीज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात दिली. “दक्षिणेमध्ये राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवला होता आणि या पदार्थाला तत्कालीन राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांच्या नावावरून सांबार हे नाव देण्यात आले. आज आपण तूर डाळ वापरून सांबार बनवत असलो तरी सर्वात पहिल्यांदा उडदाची डाळ वापरून सांबार तयार करण्यात आले”, असेही कुणालने सांगितले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या नावावरून या पदार्थाचे नाव पडल्याचे लेखी पुरावेही आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधु व्यंकोजी राजे यांचे वंशज असणार्या शहाजी राजे यांच्याशीदेखील या गोष्टीचा संबंध असल्याचा उल्लेख आहे.
सांबाराच्या जन्माची आणि नामकरणाची आख्यायिका
विविध माहितीपट आणि खाद्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार, सांबार हा मराठी पदार्थच आहे. याबाबत इतिहासाची पाने चाळून पाहिली तर अनेक संदर्भ आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांनी तंजावूरपर्यंत( आज तंजावर हा तामिळनाडूतील एक जिल्हा आहे.) मराठा राज्याचा विस्तार केला. त्यांचेच वंशज असणार्या शहाजी राजेंनी पुढे तेथील सत्ता सांभाळली. शहाजींच्या कारकिर्दीतच पहिल्यांदा सांबार बनविण्यात आल्याचे संदर्भ तामिळ साहित्यात सापडतात.
मराठ्यांच्या जेवणात तूर डाळीची आमटी हा मुख्य अन्नपदार्थ होता. एकदा शहाजी यांनी त्यांचे चुलत बंधू छत्रपती संभाजी राजे यांना मेजवानीसाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी स्वयंपाकघरातील आमसूल (कोकम) संपल्याने आचाऱ्याने आमटीमध्ये चिंच वापरली. तंजावूरमध्ये चिंच भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने आमटीची आंबट गोड चव टिकवण्यासाठी आमसुलांऐवजी चिंच वापरण्यात आली. शाही मेजवानीसाठी आलेल्या पाहुण्यांबरोबरच सर्व उपस्थितांना आमटीच्या चवीमधील हा बदल खूपच आवडला. छत्रपती संभाजी राजे हे मेजवानीसाठी आलेले खास पाहुणे असल्याने, पहिल्यांदा बनवलेल्या पण खूपच चविष्ट अशा आमटीला संभाजी आमटी असे नाव देण्यात आले. पुढे अपभ्रंश होत होत त्या आमटीचे नाव संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबारम झाले.
सांबारची निर्मिती कशी झाली?
सांबारची निर्मिती कशी झाली याबाबत डॉ. पद्मिनी नटराजन यांनी लिहिलेल्या ‘शोधनिबंधात’देखील असा उल्लेख आहे की, ‘सांबार’ हे नाव छत्रपती संभाजी राजे यांच्चया नावावरून ठेवण्यात आले आहे.
‘शोधनिबंधात नटराजन सांगतात की, “सुमारे ४०० वर्षांपूर्वी मराठे तामिळनाडूच्या तंजोर प्रदेशात छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्य करत होते. संभाजी राजे यांना उत्तम स्वयंपाक बनवता येत होता आणि त्यांना आमटी प्रचंड आवडत असे. आमटी हा महाराष्ट्रातील डाळीपासून तयार केला जाणारा पदार्थ आहे, ज्यामध्ये पदार्थाची चव आंबट करण्यासाठी कोकमचा चांगला वापर केला जात असे. कोकम मराठ्यांच्या मूळ प्रदेशातून आयात केले जात होते. एके दिवशी संभाजी राजे स्वयंपाकघरात आमटी तयार करत होते आणि तेव्हा नेमके कोकम संपले होते. तेव्हा तेथे उपस्थित सदस्य घाबरत संभाजी राजे यांना म्हणाले की, “आज त्यांची आवडती आमटी बनवता येणार नाही.” पण, त्यावेळी एक हुशार सदस्य राजेंच्या कानात कुजबुजला की, “स्थानिक लोक आमटीला चांगला आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा गर अगदी अल्प प्रमाणात वापरतात. आमटीसाठी उत्सुक असलेल्या राजेंनी तूर डाळ, भाज्या आणि मसाल्यांसह चिंचेचा गर वापरला, ज्यामुळे एक अतिशय चविष्ट पदार्थ तयार झाला. या आमटीला प्रथम ‘संभाजी आमटी’ म्हटले जात असे, पण कालांतराने त्याचा अपभ्रंश होत सांबार असे नाव पडले.
आज सांबारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक भिन्नता आढळते. तामिळनाडूमध्ये पारंपरिक पद्धतीत सांबारमध्ये कांदा आणि लसूण वापरत नाही, तर केरळमध्ये गाजर आणि बटाट्यासारख्या भाज्या वापरल्या जातात. आता हा अस्सल मराठी पदार्थ दक्षिण भारतीय पाककृतीचा इतका अविभाज्य झाला आहे की, त्याचे मूळ हे मराठ्यांशी जोडलेले आहे याचाच विसर सर्वांना पडला आहे.