CM Annapurna Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार ४१२ पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. सरकारने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. योजनेसाठी एका कुटुंबात (शिधापत्रिकेप्रमाणे ) एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येईल.
अन्नपूर्णा योजनेस पात्र कोण? (Who is Eligible For Annapurna Yojana)
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे.
- सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असेल.
- एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठ पात्र असेल.
- १४.२ किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कुठे कराल अर्ज? (Where to Apply For Annapurna Yojana)
या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे. गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे.
योजनेची कार्यपद्धती काय? (Annapurna Yojana)
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येतं. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३ मोफत सिलिंगडरचंही वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यायची ५३० प्रति सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे तसंच, तेल कंपन्यांकडून लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध केली जाणार आहे.
एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडर घेतल्यास अधिक सिलिंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही.
जिल्हानिहाय सिलिंडरच्या किंमतीत फरक आहे. त्यामुळे तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलिंडरच्या किमतीच्या आधारावर जिल्हानिहाय सिलिंडरच्या किंमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे.
नियंत्रक, शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबई तसंच, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलिंडर तपशिलाची प्रमाणित यादी, तेल कंपनीस प्रदान करायच्या रक्कमेत शिफारशीसह देयक, वित्तीय सल्लागार आणि उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांना सादर करावं लागणार आहे.
हेही वाचा >> ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’त वर्षाला तीन सिलिंडर मोफत; अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून आदेश जारी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती (Annapurna Yojana)
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत (Annapurna Yojana) द्यायच्या ३ मोफत सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.
या योजनेत ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलिंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही.
या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्र तसंच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलिंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तसंच, इतर जिल्ह्यांसाठी जिल्हा स्तरावरही समिती नेमण्यात आली आहे.
समितीचं काम काय? (Annapurna Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डनुसार कुटुंब निश्चित करणं.
सर्व निकषांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँकखाते क्रमांकासह निश्चित करणं.
या समितीकडूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कुटुंबनिहाय माहिती नियंत्रक, शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा, मुंबई जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तेल कंपन्यांना द्यावी.
या तेल कंपन्या प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी ३ गॅस सिलिंडर बाजार भावाने देतील. त्यानंतर पात्र कुटुंबांची माहिती दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस तेल कंपन्यांनी द्यायची आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन योजनांचा लाभ देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसंच तेल कंपन्यांनी घ्यावी.