मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. आपण डाव्होसमध्ये गेलो असताना जगभरात मोदींच्या धडाकेबाज कामाची प्रशंसा केली जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक किस्सा सांगितला. “लक्झेंबर्ग (Luxembourg) देशाचे पंतप्रधान माझ्याकडे आले आणि म्हणाले की, मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत एक फोटो काढाला का? आणि मोदींना तो फोटो दाखवा.”, हा किस्सा सांगितल्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडला की अशा नावाचा देश नेमका आहे तरी कुठे? त्याची भाषा कोणती? त्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या किती? या माहितीचा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की, या देशाची लोकसंख्या तर कल्याण-डोंबिवलीपेक्षाही अर्धी आहे.

लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेवियर बेटेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CMO Twitter Handle)

लक्झेंबर्ग (Luxembourg) देश नेमका आहे तरी कुठे?

लक्झेंबर्ग (Luxembourg) हा देश युरोपच्या उत्तर पश्चिम टोकाला आहे. बेल्जियम, फ्रांस आणि जर्मनीच्या सीमांना लागून असलेला लक्झेंबर्ग हा युरोपमधील सर्वात लहान देश आहे. सर्व बाजूंनी भूसीमांनी ओढलेल्या या देशाला समुद्र किनारपट्टी नाही. तीन देशांना खेटून असल्यामुळे साहजिक या देशात बहुभाषिक लोक आहेत. त्यापैकी लक्झेमबर्गिश ही त्यांची प्रमुख भाषा आहे. त्यासोबतच जर्मन आणि फ्रेंच बोलणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे.

लक्झेंबर्गचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या किती?

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, लक्झेंबर्गचे क्षेत्रफळ हे आपल्या गोवा राज्यापेक्षाही खूप कमी आहे. गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ स्केअर किलोमीटर (km²) इतके आहे तर लक्झेंबर्गचे क्षेत्रफळ हे २,५९० स्केअर किलोमीटर (km²) एवढेच आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लक्झेंबर्गची लोकसंख्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या देशाची लोकसंख्या आपल्या कल्याण-डोंबिवलीच्या लोकसंख्येपेक्षा अर्धीच आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या १२ लाख ४७ हजार ३२७ एवढी आहे. तर लक्झेंबर्गची लोकसंख्या २०२२ मध्ये केवळ ६ लाख ४७ हजार ५९९ एवढी आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने गोव्यापेक्षा लहान असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत हा देश खूपच लहान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेवियर बेटेल यांच्या भेटीचा जुना फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेवियर बेटेल यांच्यातील बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेवियर बेटेल यांची याआधी देखील भेट झालेली आहे. करोना नंतर दोन्ही देशांमध्ये व्हर्च्युअल समिट झाले होते. दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच अशी बैठक झाली होती. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणि करोनानंतर समोर येणाऱ्या संकटावर पंतप्रधानांनी चर्चा केली होती. वैश्विक व्यापाराच्यादृष्टीने लक्झेंबर्ग हे महत्त्वाचे स्थान समजले जाते. अनेक भारतीय उद्योगपतींनी देखील त्या देशात गुंतवणूक केलेली आहे.

लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेवियर बेटेल हे मोदींच्या एक वर्ष आधी म्हणजेच २०१३ साली पंतप्रधान पदावर बसले. मोदींप्रमाणेच ते देखील सलग सत्तेवर आहेत. बेटेल हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. पेशाने ते वकील असून त्यांनी लक्झेंबर्ग (Luxembourg) शहराचे महापौर पद देखील भूषविले होते.

Story img Loader