करोना विषाणूच्या कहरामुळे टाळेबंदी सुरू असलेल्या कालावधीत राज्यात दुसऱ्यांदा पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका आणि काही काळ पाऊस अशी स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्रासह कोकण विभागातही अनेक ठिकाणी उकाडय़ातही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईसहीत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईत रविवारी संध्याकाळनंतर काही ठिकाणी पावासाच्या तुरळक सरी कोसळल्या. पुढील दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पाऊस झाल्यास करोनाचा फैलाव अधिक वेगाने होईल का यासंदर्भात अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र याबद्दल डॉक्टरांचे आणि तज्ज्ञांनी सामान्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.

अवकाळी पावसाळ्यामुळे तसेच जूनमध्ये सुरु होणाऱ्या पावसाळ्याबद्दल आत्ताच चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळी वातावरणामध्ये करोनाचा झपाट्याने फैलाव होईल अशा संदर्भातील चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. मात्र दमट वातावरणामध्ये करोनाचा प्रसार वेगाने होतो अशापद्धतीची कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नसल्याने मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

‘इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्स’चे डीन डॉक्टर शशांक जोशी यांनी यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे घाबरून जाण्यासारखं काहीही नाहीय. “पावसामुळे करोनाचा संसर्ग वाढेल असं समजू नये. अद्याप करोना आणि वातावरणातील बदल यामध्ये अद्याप कोणताही संबंध असल्याची माहिती समोर आलेली नाही,” असं जोशी यांनी म्हटलं आहे. करोना विषाणू आणि त्याचा वातावरणाशी असाणारा संबंध याबद्दल दोन ठिकाणी संशोधन झालं आहे. “यापैकी एका संशोधनामध्ये कोणतेही निष्कर्ष समोर आले नाहीत. तर दुसऱ्या संशोधनामध्ये उष्ण व दमट हवामानामध्ये तापमान २५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास करोना विषाणू जिवंत राहू शकत नाही असा निष्कर्ष काढण्यात आला होता,” अशी माहिती जोशी यांनी दिली.

राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या कालावधीत मार्चमध्ये राज्यात काही भागात ऊन, तर काही ठिकाणी पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. अशा विचित्र हवामानाच्या स्थितीनंतर  एप्रिलच्या सुरुवातीला सर्वत्र कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाल्याने दिवसाच्या कमाल तापमानात वाढ सुरू झाली. मात्र, त्यातच पुन्हा पावसाला पोषक स्थिती निर्माण होऊन प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाने हजेरी लावली. शनिवारी पुण्यासह महाबळेश्वर आणि इतर काही ठिकाणी तसेच कोकणात काही ठिकाणी पाऊस कोसळला.

पुढील तीन चार दिवस काय होणार?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १३ एप्रिलला मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात  पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह मराठवाडय़ात बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद आदी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर १५ आणि १६ एप्रिलला विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे.

तापमानवाढ आणि उकाडा

राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत काहीसा वर गेला आहे. रविवारी (१२ एप्रिल) अकोला येथे ४२.८ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोलापूर, जळगाव, परभणी, बीड, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपुढे गेला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, गोंदिया या ठिकाणी तो ४० अंशांच्या आसपास आहे. कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी या भागातही दिवसाचे तापमान सरासरीेच्या पुढे आहे. रात्रीचे किमान तापमानही सरासरीच्या काहीसे पुढे गेल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे.
पाऊस पडण्याचं कारण काय?

सध्या पूर्व मध्य अरबी समुद्रापासून कर्नाटकची किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या द्रोणीय स्थितीचा प्रभाव सरासरीपेक्षा अधिक आहे. काही भागात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडय़ातही काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ स्थितीचा अंदाज देण्यात आला आहे.

 

Story img Loader