करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र या मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करणे योग्य आहे असं राज्याच्या आरोग्य विभागानेच स्पष्ट केलं आहे.

एन ९५ मास्कच्या तुटवडय़ाबाबत चुकीचे संदेश पसरविले जात आहेत. हे मास्क केवळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच वापरणे अपेक्षित आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हे मास्क उपलब्ध नाहीत, यावरून असुरक्षिततचे वातावरण निर्माण केले जात आहे. नागरिकांनी मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करणे योग्य आहे. वापरलेल्या मास्कची विशिष्ट पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु आपण ते कचऱ्यात फेकतो. कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांना यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. तेव्हा मास्कचा वापर न करता रुमालाचा वापर करावा आणि गरम पाण्यात रुमाल स्वच्छ धुवावा, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

रेल्वेतही सतर्कता : करोनाचे संशयित रुग्ण भारतातही आढळल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले केले आहे. रेल्वे मंत्रालयानेही प्रत्येक रेल्वे विभागाला सतर्क राहण्याची सूचना करताना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. प्रवाशांमधे जनजागृती करणे, रेल्वे रुग्णालयात उपचार करणे, गरज वाटल्यास स्वतंत्र वैद्यकीय कक्ष उभारणे इत्यादी सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. रेल्वेतून मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे करोना गर्दीच्या ठिकाणी जास्त फैलावू शकतो. त्यामुळेच खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

Story img Loader