एखादा नवीन स्मार्टफोन वापरताना किंवा एखादे नवीन अॅप, सॉफ्टवेअर आपण जेव्हा डाऊनलोड करत असतो, तेव्हा सायबरविश्वातील आपली गोपनीयता आणि सुरक्षितता आपण आणखी कमकुवत करत असतो. सध्याच्या करोनाकाळात डिजिटल व्यवहार, ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम करत असताना सायबर सुरक्षा आणखी महत्त्वाची बनली आहे.
करोनामुळे देशात टाळेबंदी सुरू झाल्यापासून देशातील इंटरनेटचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात डिजिटल अर्थव्यवहारांना गती मिळत आहे. मात्र, टाळेबंदीनंतर डिजिटल अर्थव्यवहारांनी प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. टाळेबंदीमुळेच अनेकांना घरात बसूनच कार्यालयीन काम करावे लागले. आता टाळेबंदी हटली तरीही, ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना भारतातील एका मोठय़ा वर्गात रुजली आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असल्याने गेल्या पाचेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. ओटीटीवरून प्रदर्शित केला जाणारा सिनेमा असो, की एखाद्या नोकरीसाठी दिलेली ऑनलाइन मुलाखत असो, इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यातील प्रभाव करोनाकाळात निश्चितच वाढला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्नांना उत्तरे दिली असली तरी, यानिमित्ताने काही संकटे आणखी गडद झाली आहेत. यापैकीच एक मुद्दा म्हणजे, सायबर सुरक्षा.
अँटिव्हायरस आणि डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असलेल्या ‘नॉर्टनलाइफलॉक’ने याच वर्षांच्या सुरुवातीला ‘डिजिटल स्वास्थ्य अहवाल’ प्रकाशित केला. त्यात सहभागी झालेल्या ८३ टक्के व्यक्तींनी आपली मुले दररोज स्मार्टफोनवर गेम खेळत असल्याचे सांगितले. त्यापैकी ३७ टक्के जणांची मुले दिवसातून दोन तासांहून अधिक वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात खर्च करतात, हे उघड झाले. हा आकडा केवळ आपल्या डिजिटल अवलंबत्वाचे एक निदर्शक आहे. आतापर्यंत संवाद, संपर्क, मनोरंजन, गेमिंग यासाठी डिजिटल वापर मोठय़ा प्रमाणात होता. मात्र, करोनाकाळात या गोष्टींसाठी डिजिटल वापर वाढत असताना आर्थिक व्यवहार, काम, शिक्षण याबाबतीतही आपली भिस्त डिजिटल माध्यमे आणि उपकरणांवर आहे.
ज्या वेळी या गोष्टींचा वापर वाढतो, त्या वेळी साहजिकच त्याच्याशी संबंधित गुन्ह्य़ांमध्येही वाढ होते. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, चाइल्ड पोनरेग्राफी, समाजमाध्यमातून प्रेमभंग, डिजिटल माहितीची चोरी, खासगीपणावर बाधा येणे असे प्रकार वाढतच राहतात. ‘नॉर्टनलाइफलॉक’च्या गेल्या वर्षीच्या सायबर सुरक्षा अहवालानुसार जगभरात ५० कोटींहून अधिक व्यक्ती किमान एकदा तरी सायबर गुन्हेगारीला बळी पडले आहेत. त्यापैकी जवळपास ३५ कोटी वापरकर्त्यांना हा अनुभव गेल्या वर्षी आला. भारतातील ८० टक्के वापरकर्ते सायबर गुन्हेगारीचे शिकार बनले असल्याचे हा अहवाल सांगतो. भारतातील ३९ टक्के वापरकर्त्यांनी ऑनलाइन ओळख चोरी अर्थात ‘आयडेंटी थेफ्ट’बाबत तक्रारी केल्या. सायबर गुन्हेगार मालवेअर हल्ल्याद्वारे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये शिरून तुमची खासगी माहिती आणि आर्थिक तपशीलही चोरी करू शकतात. त्याद्वारे ‘आयडेंटी थेफ्ट’सारखी प्रकरणे घडतात. याखेरीज वापरकर्त्यांची माहिती जाहिरातदार कंपन्या, वेबसाइटना पुरवून चांगला आर्थिक मोबदला मिळवणाऱ्यांचेही प्रमाण कमी नाही.
या सर्व पाश्र्वभूमीवर सायबर सुरक्षा या विषयाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. करोनाकाळातून बाहेर पडून जग पूर्वपदावर येईपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाशी आपली जवळीक वाढतच राहणार आहे. अशा वेळी आपल्या, आपल्या पाल्यांच्या सायबर सुरक्षेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दक्ष राहा स्मार्ट राहा
सोशल मीडियावरून आपली छायाचित्रे शेअर करणे, आपल्या आवडीनिवडी प्रदर्शित करणे, आपण भेट देत असलेल्या ठिकाणांबद्दल अपडेट देत राहाणे म्हणजे आपण ‘स्मार्ट’ वापरकर्ते आहोत, हा समज चुकीचा आहे. उलट समाजमाध्यमांतून मर्यादित स्वरूपात व्यक्त होणे म्हणजे स्मार्टपणा आहे. आपण पुरेशी दक्षता न पाळल्यास गुन्हेगारांना आपल्या ऑनलाइन खात्यात आणि आपल्या आयुष्यात घुसखोरी करण्यास मोकळे रान मिळते.
इंटरनेटवर सगळेच ‘अजरामर’
लक्षात ठेवा इंटरनेट ही अव्याहत चालू असलेली प्रक्रिया असली तरी, या प्रवाहात एकदा आलेली गोष्ट कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे इंटरनेटवरून आपण काय शेअर करतोय, याबाबत नेहमीच सजग राहा.
सार्वजनिक वायफाय टाळा
इंटरनेटचा वापर करताना सुरक्षेची काळजी घ्यायलाच हवी. सर्वप्रथम सार्वजनिक वायफाय किंवा असुरक्षित इंटरनेट जोडणीचा वापर करणे टाळा. अशा नेटवर्कमधून तुमच्या सिस्टीममध्ये शिरण्यासाठी सायबर हल्लेखोर टपून बसलेले असतात.
‘केवायसी’ फसवणुकीपासून सावध
तुम्ही ज्या ज्या डिजिटल माध्यमांत वावरता, ज्या समाजमाध्यमावर सक्रिय असता किंवा जे अॅप वापरता, त्यावर सायबर गुन्हेगारांची बारीक नजर असते. मिळेल त्या माध्यमातून ते वापरकर्त्यांची माहिती जमवत असतात. या माहितीच्या आधारे ‘केवायसी’ फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत वाढले आहेत.
ईमेलवर क्लिक करताना सावधान
तुमच्या मेलबॉक्समध्ये येणारे अनोळखी ईमेल क्लिक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशा ईमेलमधून आलेली बातम्यांची एखादी लिंकदेखील तुम्हाला सायबर चोरटय़ांच्या दारात घेऊन जाऊ शकते.