सध्या करोना विषाणूचा एक नवा प्रकार आढळून येत आहे. करोनाचा हा डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरत आहे. अर्थात याबद्दल अजून पूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी संशोधन आणि अभ्यास सुरुच आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, करोनाच्या या डेल्टा व्हेरिएंटवर लस निष्प्रभ ठरत आहे.

दिल्लीमधल्या एका वैद्यकीय संस्थेतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत हा अभ्यास करण्यात आला. या संस्थेतल्या १८८ कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारी रोजी सुरुवात झाली होती. एप्रिलच्या शेवटापर्यंत जवळपास १६०० जणांचं लसीकरण पूर्ण झालं. या रुग्णालयाने सांगितलं की, लस घेतल्यानंतरही १०टक्के कर्मचाऱ्यांना करोना झाला. विषाणूच्या अधिक काळ संपर्कात असल्याने डॉक्टर आणि नर्स तसंच इतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा- डेल्टाचा प्रसारवेग सर्वाधिक

या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतल्यानंतर हे लक्षात आलं की ७० टक्के लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. लस घेतल्यानंतरही या विषाणूचा संसर्ग होणं ही काळजीची बाब असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सरीन म्हणतात की, लसीमुळे प्रतिपिंडे तयार झाली असली तरी सध्या देण्यात येणाऱ्या लसी या नव्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात पुरेसं संरक्षण देऊ शकणार नाहीत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही दोन मास्क वापरणं अनिवार्य आहे.

सरीन यांनी असंही सांगितलं की, डेल्टा व्हेरिएंटचा अधिक गंभीर परिणाम रुग्णावर होत आहे. तसंच हा विषाणू रुग्णाच्या शरीरात अधिक काळ राहत आहे. लस न घेतलेल्या किंवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांना याचा अधिक धोका असल्याचंही सांगितलं जात आहे.

Story img Loader