देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असणाऱ्या पेटीएमने आता आपल्या युझर्सला स्वत:च्या अॅप्लिकेशनवरुन लसींचे स्लॉट शोधण्यासाठी तसेच लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची सेवा उपलब्ध करुन दिलीय. नुकतीच कंपनीने यासंदर्भातील घोषणा केली. मागील महिन्यामध्ये पेटीएमने आपल्या प्लॅटफॉर्मवर लसीकरण केंद्र शोधण्यासंदर्भातील फिचर उपलब्ध करुन दिलं होतं. यामध्ये वापरकर्त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावरील फ्री स्लॉटची माहिती दिली जायची. मात्र यामधून वापरकर्त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करता येत नव्हती. आता मात्र ती सुविधाही कंपनीने दिली आहे. जाणून घेऊयात पेटीएमवरुन स्लॉट कशापद्धतीने बुक करता येतो.
पेटीएमवरुन लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठीच्या स्टेप्स…
१) फोनमध्ये असणारं पेटीएम अॅप अपडेट करा.
२) त्यानंतर अॅपवरील सर्च बारमध्ये Vaccine Finder असा सर्च द्या. किंवा फीचर सेक्शनमध्ये जाऊन Vaccine Finder हा पर्याय निवडा.
३) आता तुम्ही राहत असलेल्या भागाचा पीनकोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती दिली जाईल. याच पेजवर एज ग्रुप म्हणजेच वयोगट आणि डोस म्हणजेच पहिला डोस की दुसरा याचा पर्याय निवडता येईल.
नक्की वाचा >> समजून घ्या : Cowin वरुन लसीकरणासाठी कशापद्धतीने करायचं रजिस्ट्रेशन
४) त्यानंतर Check Availability पर्यायावर क्लिक करा. या पेजवरच मोबाईल क्रमांक नोंदवा. हा मोबाईल क्रमांक कोविन अॅप ज्या मोबाईलवरुन वापरणार आहात त्याच मोबाईलचा असावा.
५) येथे मोबाईल क्रमांक दिल्यानंतर त्या क्रमांकावर कोविन अॅपकडून एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी पेटीएमच्या प्लॅटफॉर्मवरुन कन्फॉर्म करा आणि Done पर्यायावर क्लिक करा.
६) त्यानंतर वापरकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या घराजवळच्या केंद्रांमध्ये किती स्लॉट आणि लसी उपलब्ध आहेत याची माहिती देणारं वेबपेज ओपन होईल. मोफत की विकत या पर्यायानुसारही वापरकर्त्यांना लसींची उपलब्धता येथे समजू शकेल.
७) स्लॉट उपलब्ध असतील तर तुम्हाला सोयीस्कर असा दिवस आणि वेळ निवडता. त्यानंतर Schedule Now पर्याय निवडा.
अनेक कंपन्यांनी दिली सेवा…
कोविनचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पेटीएम, मेकमाय ट्रीप, इन्फोसिससारख्या प्रमुख डिजिटल कंपन्यांसहीत एक डझन कंपन्यांना लसीकरण नोंदणी सेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी करत आहेत. सरकारने मागील महिन्यामध्येच कोविन हे थर्ड पार्टी अॅपशी जोडण्यासंदर्भातील नवीन निर्देश दिले आहेत. त्यामुळेच डिजिटल अॅपमध्ये लसीकरण नोंदणीसाठीचे पर्याय उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर हे फिचर्स वेगवेगळ्या अॅप्सने आपल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करुन दिलेत. नुकताच केंद्र सरकारने कोविनसंदर्भातील सक्तीचा नियम शिथिल केला असून थेट जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेण्याचा पर्यायही खुला करण्यात आलाय. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी न करताही आता लसीकरण करता येणार आहे. पेटीएममध्ये देशातील ७८० जिल्ह्यांमधील उपलब्ध लसींची माहिती दिली जात आहे.