आत्तापर्यंत आपण भाजीपाला, फळांची, फुलांची शेती पाहत आलो आहे, यात हल्ली आता माशांची शेती आणि खेकड्यांची शेती देखील होते असे आपण ऐकूण आहोत, अनेकांनी ती पाहिली पण असेल. पण तुम्ही कधी मगरीची शेती ऐकली आहे का? तुम्हाला ऐकूण हे थोडं भयानक वाटेल पण जगात असा एक देश आहे जिथे मोठ्याप्रमाणात मगरीची शेती केली जाते. जिथे लाखो मगरींना पाळून त्यांचे पालनपोषण केले जाते. पण हा कोणता देश आहे जिथे मोठ्याप्रमाणात हा भयंकर प्राणी पाळला जातोय? आणि त्यामागे काय कारण आहे जाणून घेऊ…
मगर हा प्राणी पाहताच अनेकांचा थरकाप उडतो. पण थायलंड हा असा देश आहे जिथे मगरींची एकवेळी मोठी शेती केली जात आहे. भयानक बाब म्हणजे जितक्या जास्त मगरी इथे पाळल्या जातात तितक्याच कापल्याही जातात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात मगरींचे कत्तलखाने आहेत. जिथे मगरींची त्वचा, मांस आणि रक्तासाठी जिवंत कत्तल केली जाते. थायलंडमध्ये मगरींचे अनेक मोठे फर्म आहेत. या फर्ममध्ये खास मगरी हा भयानक प्राणी पाहण्यासाठी मोठ्यासंख्येने पर्यटक येत असतात.
मिरची तिखट का असते? जाणून घ्या त्यामागचे कारण
थायलंड मत्स्य विभागाच्या माहितीनुसार, याठिकाणी १००० हून अधिक मगरींचे फर्म आहेत. ज्यात सुमारे १२ लाख मगरी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व फार्ममध्ये श्री अयुथया क्रोकोडाइल फर्म थायलंडमधील सर्वात मोठी फर्म असून जी ३५ वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे.
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या फर्मचे मालक विचियन रियांगनेट यांनी म्हटले की, त्यांची फार्म कन्वेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इन्डँगर्ड स्पीशीज ऑफ वाइल्ड फॉना अँड फ्लोराच्या बा-कायद्यात रजिस्टर्ड आहे, यानुसार मगरींना कायदेशीररित्या कापले जाते. त्यांना मगरीपासून बनवलेली उत्पादने बनवून निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे.
मगरींच्या अवयवांची किंमत किती?
मगरींच्या अवयवांच्या काही भागांपासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. मगरींच्या पित्त आणि रक्ताचा वापर औषधांमध्ये केला जातो. मगरीच्या रक्ताची किंमत 1000 रुपये प्रति किलो आणि पित्ताची किंमत 76 हजार रुपये प्रति किलो आहे. तर मगरीचे मांस 570 रुपये किलो दराने विकले जाते.
मगरीच्या त्वचेपासून बनवल्या जातात ‘या’ महागड्या वस्तू
मगरीच्या त्वचेपासून हँडबॅग, लेदर सूट, बेल्ट यांसारखी उत्पादने बनवली जातात. मगरीच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्यांची किंमत 1.5 लाख रुपये ($2356) पर्यंत आहे. त्याच वेळी, लेदर सूटची किंमत सुमारे 4 लाख रुपये ($ 5885) आहे. यामुळे थायलंडमध्ये मगरीपासून अनेक उद्योग सुरु आहे.