Delhi’s Name History : देशाची राजधानी दिल्ली या शहराचा इतिहास प्रचंड मोठा आहे. येथील ऐतिहासिक वास्तू या शहराची ओळख सांगतात. ‘दिलवालों की दिल्ली’ हे वाक्य तुम्ही अनेक दिल्लीप्रेमींकडून किंवा तेथील रहिवाशांकडून ऐकले असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला का की, शहराला दिल्ली हे नाव कसं पडलं? या शहराच्या नावामागचा इतिहास काय? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

दिल्लीवर मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत अनेकांनी राज्य केले; पण या शहराचे नाव कधीही मुघल सम्राटाच्या नावावर किंवा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून ठेवले गेले नाही किंवा ते बदलले गेले नाही, मग हे नाव आले तरी कुठून?

शहराला दिल्ली हे नाव कसं पडलं?

या शहराच्या नावावरून अनेक आख्यायिका आहेत. इतिहासकारांच्या मते, राजा धिल्लूने (King Dhilu ) इसवी सन पूर्व ८०० च्या सुमारास नैर्ऋत्य दिशेने एक शहर वसवले. त्याला प्रेमाने धिल्लू किंवा दिलू, असे म्हटले जायचे. असे मानले जाते की, दिल्ली हे नाव याच नावावरून ठेवण्यात आले. ज्या भागात त्याने हे शहर वसवले, त्या ठिकाणी आता कुतुबमिनार आहे.

काही इतिहासकारांच्या मते, तोमर राजवंशाने दिल्लीच्या त्रिकोण प्रदेशातील काही भागांचा समावेश करून अनंगपूर बांधले. त्यानंतर ही वस्ती पुढे १० किलोमीटर स्थलांतरीत करण्यात आली आणि त्याचे नाव लाल कोट, असे ठेवण्यात आले. हे नाव जवळजवळ १०० वर्षे टिकून राहिले.

११६४ मध्ये पृथ्वीराज चौहान यांनी या भागात अनेक किल्ले बांधले होते आणि त्या वेळी शहराला ‘किला राय पिठोरा’ म्हणून ओळखले जात असे. आणखी एक आख्यायिका सांगते की, दिल्ली हे नाव ‘दहली’ किंवा ‘देहली’ या शब्दापासून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘प्रवेशद्वार’असा होतो.

इंद्रप्रस्थ : प्राचीन नाव

एका आख्यायिकेनुसार, दिल्लीला एकेकाळी ‘इंद्रप्रस्थ’ असे म्हटले जात असे. शहराचा एक भाग अजूनही या नावाने ओळखला जातो. महाभारतातील कथांनुसार, पांडवांनी भगवान श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन भगवान इंद्र आणि महान शिल्पकार विश्वकर्मा यांच्या मदतीने हे शहर बांधले. इंद्राच्या नावावरून या शहराचे नाव इंद्रप्रस्थ, असे ठेवण्यात आले.

काही इतिहासकारांचा असा दावा आहे की, या शहराचे मूळ नाव ‘दिल्लीका’ होते, जे नंतर ‘दिल्ली’ असे झाले.
मध्ययुगीन काळात दिल्ली हे सात सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक होते. ‘Delhi’ हे इंग्रजी नावदेखील ‘दिल्लीका’ या शब्दापासून आले आहे, असे म्हणतात.