अनेकांना तिखट झणझणीत पदार्थ आवडतात. त्यामुळे तिखट मिरची किंवा मसाल्यांचा वापर त्यांच्याकडून केला जातो. विशेषत: लाल मिरच्यांच्या जातीनुसार त्यांचा तिखटपणा ओळखला जातो. त्यातील काही मोजक्याच लाल मिरच्या आपल्याला माहीत असतील; पण यातील सर्वांत तिखट मिरची कोणती तुम्हाला माहितेय का? खरं तर, कॅरोलिना रीपर ही सर्वांत तिखट मिरची आहे. पण, कॅरोलिना रिपर मिरचीनं आता तिचा हा बहुमान गमावला आहे. कारण- पेपर एक्स या मिरचीनं आता सर्वांत तिखट मिरचीचा किताब जिंकला आहे. एवढंच नव्हे, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या मिरचीची सर्वांत तिखट मिरची म्हणून नोंद झाली आहे.
कॅरोलिना रीपर या मिरचीच्या नावे पूर्वी हा किताब होता. सर्वांत तिखट मिरची म्हणून कॅरोलिना रीपर ओळखली जायची. पण, त्याहूनही तिखट मिरचीचा आता शोध लागला आहे. ही मिरची खाल्ल्यानंतर काही तास शरीरात झिणझिण्या निर्माण होतात आणि ते बधीर झाल्यासारखं होतं. म्हणूनच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक तिखट मिरची म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
मिरचीचा तिखटपणा कसा मोजतात?
स्कोविल हीट युनिट हे तिखटपणा मोजण्याचं मापक आहे. आपल्या नेहमीच्या आहारात जी हिरवी मिरची असते, तिचा तिखटपणा स्कोविल हीट युनिट (SHU) पाच हजार ते एक लाखापर्यंत असतो. कॅरोलिना मिरचीचा तिखटपणा १० लाख ६४ हजार SHU आहे; तर पेपर एक्सचा तिखटपणा २६ लाख ९३ हजार SHU आहे. हजारो लोकांसाठी बनवलेल्या जेवणात तुम्ही पेपर एक्सची एक मिरची वापरली तरी ते जेवण तुम्हाला तिखटच लागेल.
पेपर एक्सचे जनक कोण?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं उत्पादन कुठे आणि कसं झालं? अमेरिकेत राहणारे एड करी यांना पेपर एक्स या मिरचीचं जनक मानलं जातं. १० वर्षांपासून एड करी त्यांच्या शेतात सर्वांत तिखट मिरचीचं क्रॉस ब्रीडिंग करीत होते. अखेर त्यांनी त्यांच्याच शेतात उत्पादन केलेल्या कॅरोलिना रीपर आणि त्यांच्या एका मित्रानं दिलेल्या मिरची प्रकाराचं क्रॉस ब्रीडिंग करून पेपर एक्सचं उत्पादन केलं. कॅरोलिना रीपर ही जगातील सर्वांत जास्त तिखट मिरची होती. परंतु, याच मिरचीची प्रजात असलेली पेपर एक्स ही मिरची सर्वांत तिखट मिरची ठरली आहे.
जगात फक्त पाच जणांनी चाखली ही मिरची
गिनीज बुकच्या म्हणण्यानुसार, एड करीसह आतापर्यंत जगात फक्त पाच जणांनी ही मिरची चाखली आहे. यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मिरच्या खाल्ल्यानंतर त्यांना साडेतीन तास तिखटपणा जाणवत राहिला. तर २ तास शरीर बधीर झाल्यासारखे वाटले. त्यानंतर स्नायूंमध्ये क्रॅम्प सुरू झाले. अशापरिस्थितीत ते २ तास पावसात भिजत होते.