Moon Mission : ४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने (soviat russia) जगातील पहिला कृत्रिम उपग्रह स्फुटनिक (Sputnik 1) अवकाशात पाठवला आणि तेव्हा शीत युद्धासाठी आणखी एक मैदान खरं तर अवकाश उपलब्ध झाले. अवकाशात विविध प्रकारचे उपग्रह पाठवत कुरघोडी करण्याची स्पर्धा तेव्हाचे शक्तीशाली देश अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये सुरु झाली.
विविध उपग्रह पाठवत रशियाने पुढील काही वर्षे ही आघाडी टीकवत अनेक विक्रम रचले. अखरे रशियाच्या आधी अंतराळवीर चंद्रावर उतरवत अमेरिकेने ही अत्यंत खार्चिक पण अवकाश तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल करणारी अवकाश स्पर्धा जिंकत रशियाला मागे टाकले.
मात्र सोव्हिएत रशियाने चंद्राच्या बाबतीत अनेक विक्रम रचले. चंद्राच्या जवळून जाणारे पहिले यान, चंद्राचे छायाचित्र घेणारे पहिले यान, तेव्हापर्यंत कधीही न दिसलेल्या चंद्राच्या मागच्या बाजूचे छायाचित्र काढणारे पहिले यान, चंद्रावर आदळवत पहिले मानवी अस्तित्व उमटवणारे पहिले यान, चंद्राचा उपग्रह म्हणून प्रदक्षिणा घालणारे पहिले यान म्हणून रशियाच्या विविध यान-उपग्रहांनी यशस्वी कामगिरी बजावली.
हेही वाचा… रशियाचे लुना-२५ कोसळले; चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण आहे का?
यामध्ये आणखी एक पराक्रम तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या तंत्रज्ञानांनी करुन दाखवला. चंद्रावर अलगद उतरण्याची (soft landing) स्पर्धा अमेरिका आणि रशियामध्ये सुरुच होती. चंद्रापर्यंत पोहचतांना दोन्ही देशांना अनेक मोहिमांच्या अपयशाला सामोरं जावं लागलं. मात्र ३ फेब्रुवारी १९६६ रशियाचे Luna 9 हे यान चंद्राच्या विषुववृत्तावर यशस्वीपणे अलगद उतरले.
Luna 9 हे यान ३१ जानेवारी १९६६ ला प्रक्षेपित करण्यात आले. अवघ्या सहा दिवसांचा प्रवास करत हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचले. या यानाचे एकुण वजन हे सुमारे १६०० किलो होते तर चंद्रावर उतरणाऱ्या भागाचे वजन हे १०० किलोच्या आसपास होते. चंद्रावर उतरल्यावर विविध उपकरणांच्या सहाय्याने चंद्राच्या अभ्यासाचे नियोजन करण्यात आले होते.
हेही वाचा… रशियाचे ‘लुना’ कोसळले; चांद्रयान उतरण्यास सिद्ध, २३ तारखेला ६.०४ वाजता ‘विक्रम’चे अवतरण
चंद्रावर उतरलेले Luna 9 हे पुढील फक्त तीन दिवस कार्यरत राहीले आणि त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. असं असलं तरी या यानाने पाठवलेली माहिती, घेतलेल्या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवरील परिस्थितीची माहिती मिळवण्यात यश आले. चंद्रापर्यंत पोहचण्यात अनेक मोहिमांत अपयश आलेल्या रशिया आणि अमेरिका सारख्या देशांना एकप्रकारे चंद्रावर उतरण्याचा मार्ग Luna 9 मुळे खऱ्या अर्थाने मोकळा केला.
यानंतर तीन वर्षातच अमेरिकमुळे पहिले मानवी पाऊल चंद्रावर उलटले आणि खऱ्या अर्थाने चांद्र स्पर्धा अमेरिकेने जिंकली.
अमेरिका आणि चीनमुळे रशिया पुन्हा एकदा luna 25 या यानाच्या मार्फत स्पर्धेत उतरु बघत होता. मात्र चंद्राभोवती पोहचल्यावर शेवटच्या क्षणी रशियाला अपयश आले. आता भारताचे – इस्रोचे ( ISRO ) चांद्रयान ३ नेमकं हेच करणार आहे, चंद्रावर अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे, उतरल्यावर एक रोव्हरही तिथे संचार करणार आहे, तेही कधीही न स्पर्श झालेल्या चंद्राच्या दक्षिण भागात. चंद्रावर उतरण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण अश्या या शेवटच्या टप्प्यात चांद्रयान ३ नेमकी कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.