मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यस्तरीय आंदोलन पुकारलं. तसंच, सप्टेंबर महिन्यात त्यांनी उपोषणही केलं. आरक्षण मिळत नाही तोवर हे उपोषण सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिला होता. तसंच, आताही त्यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, अनेकजण या बेमुदत उपोषणाला आमरण उपोषण असं संबोधतात. परंतु, आमरण उपोषण ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे, असं कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नेमका कोणता शब्दप्रयोग बरोबर हे पाहून घेऊयात.
विविध मागण्या पूर्ण करण्याकरता, सरकार दरबारी आपले प्रश्न मांडण्याकरता, आपल्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता उपोषणाचं अस्र उगारलं जातं. कधी हे उपोषण लाक्षणिक असतं तर कधी बेमुदत असतं. बेमुदत उपोषण म्हणजेच ज्या उपोषणाला कोणतीही मुदत नसते. मागण्या मान्य होत नाहीत तोवर हे उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा या बेमुदत उपोषणातून दिला जातो. पण, अनेकजण याच उपोषणाला आमरण उपोषण म्हणतात. एवढंच कशाला जे स्वतः बेमुदत उपोषणाला बसलेले असतात तेही त्यांच्या फलकावर आमरण उपोषण असाच शब्दप्रयोग करतात. तर अनेक बातम्यांच्या मथळ्यामध्येही आमरण उपोषण असा उल्लेख आढळतो. पण आमरण उपोषण हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचं अनेक भाषातज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तो कसा चुकीचा आहे हे जाणून घेऊयात.
हेही वाचा >> सुपारी, अडकित्ता हे शब्द मराठी भाषेत आले कुठून? या शब्दांच मूळ अर्थ काय? जाणून घ्या रंजक गोष्ट
दोन्ही शब्दांमधील योग्य शब्द कोणता?
‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम म्हणतात, “जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी (अण्णा हजारे) सुरू केलं आमरण उपोषण. दैनिकातील पहिल्या पानावरचा तो मथळा पाहून हसूच आलं. कारण अण्णांचं ते उपोषण आमरण ठरू नये अशी मनापासून सदिच्छा होती आणि ते तसं नव्हतंसुद्धा. ते तर होतं बेमुदत उपोषण. म्हणजेच त्याला आठवडा – पंधरादिवसांची अशी मुदत अण्णांनी घातली नव्हती. आमरण या शब्दाचा अर्थच होतो मरेपर्यंत. अण्णांचंच काय इतर कुणाचंही उपोषण तसं नसतंच आणि नसावं. समाजसाठी या व्यक्ती महत्त्वाच्याच. म्हणूनच ते उपोषण असतं बेमुदत.