Digital Dementia : आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप वापरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मग लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती, प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा दिसतोच. लहान मुले खेळण्याऐवजी आजकाल मोबाईल वापरताना दिसतात. एवढंच काय तर? जेवतानाही त्यांना हातात फोन हवा असतो. मोठी व्यक्ती असो किंवा लहान मुले सर्वजण तासनतास फोनमध्ये वेळ घालवताना पाहायला मिळतात. मग फोनमध्ये फिल्म पाहणे, सोशल मिडिया वापरणे किंवा रिल्स पाहणे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? जर मोबाईल किंवा इतर डिजिटल गॅजेट्सचा जास्त प्रमाणात वापर करणंही धोकादायक ठरू शकतं. यामुळे अनेक धोकादायक आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. यापैकीच एक म्हणजे डिजिटल डिमेंशिया. आता आपण डिजिटल डिमेंशिया (Digital Dementia) म्हणजे काय या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात…
डिजिटल डिमेंशिया म्हणजे काय?
डॉक्टरांच्या मते, डिजिटल डिमेंशिया म्हणजे विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश. आता डिजिटल डिमेंशिया ही समस्या विशेषतः अशा लोकांमध्ये आढळून येते, जे लोक लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा जास्त प्रमाणात वापर करतात. लॅपटॉप, मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे त्याचा त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम होतो. ज्यावेळी आपण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतो, तेव्हा अनेक व्हिडिओ, ॲप्स, चित्रे पाहत असतो. त्यांचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे आपण सर्वकाही व्यवस्थित लक्षात ठेवू शकत नाही. याचा अर्थ की तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूची कार्यप्रणाली बिघडू लागते आणि अशा स्थितीत मेंदू कमकुवत होऊ लागतो. यामधून आपल्याला विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, इंटरनेटच्या अतिवापरामुळे मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी होते, याला डिजिटल डिमेंशिया म्हटलं जातं.
हेही वाचा : WIFI चा शोध नेमका कसा लागला माहीत आहे का?
डिजिटल डिमेंशियाची लक्षणे काय असतात?
आपल्याला कशावरही लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होणं ही डिजिटल डिमेंशियाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळा येणे किंवा लक्ष न लागणे. तसेच वारंवार एखादी गोष्ट विसरणे आणि त्याची स्मरणशक्ती कमी होणे.
डिजिटल डिमेंशियाची लक्षणे असणाऱ्या लोकांना झोपेच्या समस्याही असतात. ते रात्रीचे तासनतास तास स्क्रीनसमोर घालवतात. ज्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. त्यांना कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही.
डिजिटल डिमेंशियापासून बचावासाठी काय करावं?
डिजिटल डिमेंशियाचा त्रास टाळण्यासाठी व्यक्तींनी कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित ठेवावा. स्क्रीन वेळ कमी करावा आणि नियमित व्यायाम करावा, निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घ्यावा, असं केल्यास डिजिटल स्मृतिभ्रंश यावर आपण मात करू शकतो. डिजिटल डिमेंशिया (Digital Dementia) ही एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे आपण याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.