‘मोस्टलीसेन’ या नावाने चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली यूट्यूबर-अभिनेत्री प्राजक्ता कोळी ही नुकतीच लग्नबंधनात अडकली. १३ वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर मंगळवारी (२५ फेब्रुवारी) तिने तिचा प्रियकर वृषांक खनाल याच्याशी लग्न केले. मिसमॅच्ड फेम ही अभिनेत्री प्राजक्ता काही दिवसांपासून तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. तिचे हळद, मेंदी, संगीत, लग्नातील अनेक सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. मेंदीपासून लग्नापर्यंत तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. प्राजक्ताने तिच्या लग्नसोहळ्यात नेपाळी संस्कृतीचे पारंपरिक दागिने परिधान केले होते.
प्राजक्ता आणि वृषांक यांनी त्यांच्या पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंपैकी एका लूकची चर्चा होत आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीवर गळ्यात हिरव्या रंगाचा मोठा हार परिधान केल्याचे दिसत आहे. या अलंकाराबाबत सर्वांनाच उत्सुकता वाटत आहे. हा अलंकार नेपाळी संस्कृतीचा भाग आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
तिल्हारी म्हणजे काय?
प्राजक्ताने लग्नसोहळ्यात गळ्यात हिरव्या रंगाचा मोठा हार घातला, ज्याला ‘तिल्हारी’ असे म्हणतात. तिल्हारी हे विवाहित नेपाळी महिलांचे मंगळसूत्र स्वरूप आहे. लग्नसोहळ्यात वर आपल्या वधूच्या गळ्यात ‘तिल्हारी’ मंगळसूत्र म्हणून घालतो. नेपाळी महिलांसाठी तिल्हारी हे सौभ्याग्याचे प्रतीक आहे.
तिल्हारी हे सोन्यापासून बनविलेल्या अतिशय लोकप्रिय हारांपैकी एक आहे. ते लाल, हिरवे व पिवळे अशा अनेक रंगांच्या मण्यांनी बनविलेल्या पेंडेंटसारखे दिसते. हा नेपाळी महिलांसाठी एक महत्त्वाचा अलंकार आहे. लग्नसोहळ्यामध्ये वर वधूच्या गळ्यात ‘तिल्हारी’ घालतो. ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि ते आपल्या पतीचे आयुष्य वाढवते, असा नेपाळी महिलांचा विश्वास आहे. नेपाळी महिला विवाहित असल्याचे पारंपरिक प्रतीक म्हणून ‘तिल्हारी’ घालतात. विवाहित महिला पूजा, लग्न समारंभ आणि तिहार यांसारख्या पारंपरिक सणांच्या वेळी आणि विशेषतः ‘तीज’ला हा अलंकार घालतात. तिल्हारी ही हिंदू विवाहित महिलेला तिच्या पतीकडून मिळालेली एक मौल्यवान भेट असते.
‘तिल्हारी’ खूप वेगवेगळ्या डिझाइनमध्ये आणि वेगवेगळ्या आकारांत पाहायला मिळते. जसे की महिला तिरक्या पद्धतीने गळ्यात तिल्हारी घालू शकतात. खूप लांब अशा ‘तिल्हारी’ला चडके तिल्हारी (Chadke Tilhari) म्हणतात; तर लहान तिल्हारी रोज परिधान केले जाते. त्याचा आकार लहान असो किंवा मोठा नेपाळी विवाहित महिलांसाठी ‘तिल्हारी’ खूप महत्त्वाचा अलंकार आहे.
दौरा सुरुवाल
लग्नसोहळ्यात प्राजक्ताचा पती वृषांक याने ‘दौरा सुरुवाल’ (Daura Suruwal) हा नेपाळी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. दौरा सुरुवाल हा नेपाळी संस्कृतीतील पोशाखाचा एक प्रकार आहे.