दो गज दुरी, मास्क है जरुरी…हे रोज ऐकून ऐकून आता आपल्या सगळ्यांनाच पाठ झालं असेल किंबहुना आता हे सूत्र आपल्या जगण्याचा भाग झालेलं आहे. मात्र, या सूत्रामध्ये अभ्यासकांनी आणि वैज्ञानिकांनी आता काही बदल केलेत. करोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव पाहता हे बदल करणं भाग आहे. काय आहेत हे बदल..समजून घ्या सविस्तर!
करोनाचा आत्ताच्या स्वरुपातला विषाणू हा वाऱ्याच्या मदतीनं दहा मीटरपर्यंत पसरु शकतो. म्हणजे साधारणपणे ३३ फुटांपर्यंत हा विषाणू पसरु शकतो. यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की करोनाच्या संसर्ग होऊ नये यासाठी बाधित आणि निरोगी व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे, अर्थात जेव्हा मास्क परिधान केला नसेल तेव्हा!
मात्र, आता सरकारचे वैद्य़कीय सल्लागार प्राध्यापक के विजयराघवन यांनी सांगितलं की, मोकळ्या जागेत संसर्गाचा धोका तुलनेने कमी आहे कारण विषाणूचे कण वेगाने पसरुन, विरुन जातात.
करोना कसा पसरतो?
करोनाबाधित रुग्णांच्या नाकातून आणि तोंडातून बाहेर पडणाऱ्या द्रवरुप कणांमुळे करोनाचा संसर्ग होतो. कशा पद्धतीने दुषित झालेली हवा जर निरोगी माणसाच्या फुफ्फुसांमध्ये गेली किंवा बाधिताने स्पर्श केलेल्या जागेला निरोगी व्यक्तीने हात लावला आणि तोच हात तसाच नाकात, डोळ्यात, तोंडात घातल्यास करोनाचा संसर्ग होतो. लाळ आणि नाकातून बाहेर पडणारं द्रव, थेंबांमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग होतो. मोठ्या आकाराचे थेंब जागेवर पडून राहतात, तर छोटे थेंब हवेतून लांबवर पसरतात. बंद जागेमध्ये या थेंबांमुळे संसर्गाचा धोका वाढतो.
धोका कशापासून आहे?
- नाक आणि तोंडातले थेंब अर्थात ड्रॉपलेट्स हे संसर्गाचं प्रमुख माध्यम आहे.
- हे ड्रॉपलेट्स करोनाबाधितापासून २ मीटरपर्यंतच्या परिसरात पसरतात.
- ह्यापैकी छोटे थेंब, एरोसोल्स वाऱ्याच्या माध्यमातून १० मीटरपर्यंत पसरतात.
करोनापासून बचाव करण्यासाठी काय करावं?
- लोकांच्या आसपास वावरताना दोन मास्क परिधान करावेत.
- घरातली हवा खेळती असावी, दारं-खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- एकमेकांपासून १० मीटरपर्यंतचं अंतर राखावं.
- करोनाबाधितांना अलगीकरणात ठेवावं आणि शक्य असल्यास त्यांनी N-95 मास्क परिधान करण्यास सांगावं.
- संपूर्ण घर, शरीर वारंवार साफ ठेवावं, निर्जंतुकीकरण करावं.