आपल्यापैकी प्रत्येकाने आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली किंवा मेडीकलमधून घ्यायला सांगितलेलं औषधे खाल्ली असतील. आपण आजारी पडल्यास किंवा एखाद्या अपघातात जखमी झाल्यानंतर औषधं आपला जीव वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे औषधं आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. औषधे निर्धारित मानकांनुसार तयार केली जातात. अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपणाला औषधं खूप मदत करतात.
पण औषधे खरेदी करताना आणि वापरताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लोक औषधांच्या एक्सपायरी डेटबाबत खूप सतर्क असतात आणि ते बरोबर देखील आहे. एखादे औषध एक्सपायर म्हणजेच मुदतबाह्य झाले असेल तर आपण ते खात नाही. लोकांची अशी समजूत आहे की, औषध एक्सपायर झाल्यानंतर ती हवं तसं काम करत नाहीत आणि एक्सपायरी डेटनंतर ती विषासमान होतात. यासाठी औषध खरेदी करताना ती एक्सपायर झाली नाहीत ना? हे बघूनच घ्या, असं आपणाला वारंवार सांगितलं जातं. शिवाय एक्सपायर झालेली ओषधं खाल्यावर जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातें. तर या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे याबाबतची माहिती आज जाणून घेऊया.
एक्स्पायरी डेटनंतर औषध विष बनतं?
समजा एखादं औषधं ३१ डिसेंबरला एक्सपायर झाले असेल, तर आपण ते १ जानेवारी किंवा त्यानंतर खाऊ शकतो का? पहिली गोष्ट म्हणजे एक्सपायरी डेट संपल्यानंतर लगेच औषधांचे विष बनत नाही. जगातील सर्व औषध बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या औषधांवर जी एक्सपायरी डेट टाकतात. त्याचा अर्थ असा असतो की, एक्सपायरी डेट संपल्यानंतर त्या औषधाची सुरक्षितता आणि परिणाम याबाबत कंपनीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
हेही वाचा- रसायने न वापरता पिकवलेला अस्सल हापूस आंबा कसा ओळखतात माहीत आहे? घ्या जाणून
एक्सपायर झालेले औषध खावी का?
एक्सपायर झालेली औषधे खायची की नाही? आणि ती खाल्ली तर काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो यावर यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन सल्ला देते की, एक्सपायर झालेली औषधे कधीही खाऊ नयेत. ती खाणं खूप धोकादायक ठरु शकतं. औषधांच्या बाबतीत आपण सर्वांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही चुकून एक्सपायर झालेले औषध खाल्लयास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. शिवाय घरामध्ये ठेवलेली औषधे नेहमी लहान मुलांपासून लांब ठेवावी, मग ती एक्सपायर झालेली असो वा नसो.