What is Difference between BMI and BRI: हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना असमतोल वजन, लठ्ठपणा या समस्या कमालीच्या भेडसावत आहेत. आपण लठ्ठ आहोत का? नेमके किती लठ्ठ आहोत? हे तपासण्यासाठी आजवर शरीर वस्तुमान निर्देशांक अर्थात बॉडी मास इंडेक्स (BMI) ही पद्धत अवलंबली जात होती. तुम्ही व्यायामशाळेत गेलात, तर तिथे बीएमआयचा चार्ट लावलेला आपल्याला आढळतो. आपली उंची आणि त्यानुसार किती वजन असायला हवे, याचे विवरण बीएमआयच्या चार्टमध्ये दिसते. यानुसार आपले वजन प्रमाणापेक्षा अधिक किंवा कमी आहे, हे ओळखता येते. पण बीएमआयची आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्तता किती याबद्दल आता प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच बीआरआय (BRI) ही नवी पद्धत आता समोर येत आहे.
बीएमआयनुसार उत्तम वजन राखून असलेल्या व्यक्तींनाही मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल असे गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. कारण बीएमआयनुसार एखाद्याचे वजन नियंत्रणात दिसत असले तरी त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी असू शकते, हे कळून येत नाही. दुसरीकडे खेळाडूंच्या बाबतीत बीएमआयचा उपयोग होऊ शकतो, कारण अशा व्यक्तींच्या शरीरातील स्नायूंचे वजन अधिक भरते.
हे वाचा >> वय आणि उंचीनुसार वजन किती हवे? तुमचे वजन कमी की जास्त? परफेक्ट बॉडीसाठी एकदा ‘हा’ सोपा चार्ट पाहा
बीएमआय कसा मोजतात?
शरीराचे वजन (कि.ग्रॅ) आणि उंची२ (मीटर्स) यांचे गुणोत्तर म्हणजे शरीर वस्तुमान निर्देशांक होय. ही व्यक्तीच्या वजनाची प्रमाणबद्धता पडताळण्याची एक पद्धत आहे. व्यक्तीच्या लठ्ठपणाची पातळी शरीर वस्तुमान निर्देशांकाद्वारे मोजता येते. व्यक्ती लठ्ठ आहे किंवा नाही, हे पडताळण्याची ही एक सोपी, योग्य आणि अचूक पद्धत आहे.
बीएमआय विरुद्ध बीआरआय
स्नायूंचे वजन आणि खराब चरबी यांच्यातील फरक ओळखून मृत्यूच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? असे प्रश्न अनेकांना पडले होते. यात आता बीआरआय म्हणजेच बॉडी राऊंडनेस इंडेक्स या नव्या पद्धतीचा वापर होत आहे. लठ्ठपणा मोजण्याची ही वैज्ञानिक पद्धत असल्याचे म्हटले जाते. या पद्धतीद्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये चयापचयाशी निगडित समस्या, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल विकसित होत आहे की नाही? याचा तपास अधिक वैज्ञानिक पद्धतीने करणे शक्य होणार आहे. बीआरआय हा लठ्ठपणाच्या बाबतीत अचूक अंदाज वर्तवत असल्याचा निष्कर्ष जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या लेखातून काढण्यात आला आहे.
बीआरआय निर्देशांक म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीची आरोग्याची अचूक माहिती मिळविण्यासाठी त्याची उंची आणि कमरेचा घेर लक्षात घेतला जातो, त्या पद्धतीला बॉडी राऊंडनेस इंडेक्स म्हणतात. या पद्धतीत त्या व्यक्तीचे उंचीनुसार वजन लक्षात न घेता त्याचा कमरेचा आकार किती आहे, हे तपासले जाते. तज्ज्ञांच्या मतानुसार बीआरआयद्वारे कमरेच्या ठिकाणी असलेला लठ्ठपणा आणि अतिरिक्त चरबीचा अंदाज व्यक्त करते, जे टाइप टू मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते.
बीएमआय प्रमाणेच काही ऑनलाईन संकेतस्थळावर बीआरआय मोजण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला उंची, कंबर आणि पार्श्वभागाचे मोजमाप तिथे टाकावे लागते आणि संकेतस्थळ तुम्हाला तुमचा बीआरआय स्कोअर सांगते. यावरून तुम्ही निरोगी आहात की नाही? याचा अंदाज काढू शकाल.
बीआरआय निर्देशांक कुणी विकसित केला?
न्यूयॉर्क वेस्ट पॉईंट येथील युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमीमध्ये प्राध्यापक असलेल्या गणितज्ञ डायना थॉमस यांनी बीआरआय निर्देशांक पद्धत विकसित केली. ओबेसिटी जर्नलमध्ये २०१३ साली लिहिलेल्या लेखात त्यांनी पहिल्यांदा बीआरआय निर्देशांकाची माहिती दिली.