Hanuman Mandir In Pakistan : हिंदू धर्मात हनुमानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात प्रत्येक गावात आणि शहरात हनुमानाचं मंदिर हे तुम्हाला दिसेल. भक्त मोठ्या श्रद्धेनं मंदिरात जाऊन हनुमानाची मनोभावे पूजा करतात; पण तुम्ही कधी विचार केला का की, भारताशिवाय आणखी कोणत्या देशात हनुमानाचं मंदिर असू शकतं? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या शेजारच्या देशात म्हणजेच पाकिस्तानमध्येही हनुमानाचं मंदिर आहे ते. होय, पाकिस्तानातील कराचीमध्ये १५०० वर्षांपूर्वीचं जुनं हनुमानाचं मंदिर आहे. हे मंदिर श्री पंचमुखी हनुमान मंदिर या नावानं ओळखलं जातं. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
श्री पंचमुखी हनुमान मंदिर
हे पाकिस्तानमधील अशा काही मंदिरांपैकी एक आहे; जे हिंदू धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली जात असताना वाचलं होतं. हे मंदिर सिंध सांस्कृतिक वारसा संवर्धन कायदा १९९४ अंतर्गत राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. सिंध प्रांतातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू किंवा ठिकाणांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.
या मंदिराला एक विशेष महत्त्व आहे. कारण- जगातील हे असं एकमेव मंदिर आहे; जिथे हनुमानाची मानवनिर्मित नाही, तर नैसर्गिक मूर्ती आहे. म्हणजेच पौराणिक कथांनुसार हनुमानाची ही त्रेतायुगातील आठ फूट उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. हे मंदिर अशा ठिकाणी आहे की, जिथे हनुमान भक्तासाठी प्रकट झाले होते आणि वनवासादरम्यान रामानंही या ठिकाणी भेट दिली होती, अशी आख्यायिका आहे.
हेही वाचा : KYC Fraud : केवायसी घोटाळा म्हणजे काय? फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?
दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी
कराची येथे सोल्जर बाजारमध्ये हे मंदिर स्थित आहे. हनुमानाची ही मूर्ती १५०० वर्षं जुनी आहे. अठराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. हनुमानाची ही स्वयंभू मूर्ती असल्यानं लोकांची त्यावर खूप श्रद्धा आहे. अनेक भक्त हनुमानाला ११ प्रदक्षिणा घालतात. त्यांच्या मते- असं केल्यानं त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं कराची हे शहर पाकिस्तानातील सर्वांत मोठं आणि प्रमुख बंदर आहे. कराचीच्या या हनुमान मंदिरात भारतातूनही मोठ्या संख्येनं भक्त येतात.