जगभरातील चित्रपटांत वेगवेगळे प्रयोग होत असतात. चित्रपटाच्या माध्यमातून सतत काहीतरी हटके द्यायचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो पण यात विदेशी मंडळी फारच पुढे पोचली आहेत. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल माहिती घेणार आहोत जो पाहण्यासाठी तुम्हाला तुमची वयाची १०० वर्षं पूर्ण करावी लागणार आहेत. अगदी बरोबर ऐकलंत, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला १०० वर्षं थांबावं लागणार आहे. नेमकी काय आहे ही भानगड जाणून घेऊया.
हा अजब चित्रपट कोणता?
ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. ‘१०० इयर्स- द मूवी यू विल नेवर सी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. २०१५ साली या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं, पण हा चित्रपट २११५ रआली प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार आहे हे आपल्याला पाहता येणार नाही, यामुळेच याचं नावदेखील तसंच ठेवण्यात आलं आहे, एक असा चित्रपट जो आपण कधीच पाहू शकणार नाही. या चित्रपटाचा विषयही गुप्त ठेवण्यात आला आहे. याची स्क्रिप्ट जॉन मालकोविच यांनी लिहिली आहे आणि त्यांनी यात अभिनयही केला आहे. रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.
आणखी वाचा : एखादं व्यसन कसं सोडावं? भाऊ कदम यांच्या प्रश्नावर गौर गोपाल दास यांचं समर्पक उत्तर
ही संकल्पना सुचली कशी?
हा चित्रपट १०० वर्षांनी प्रदर्शित करायचा ही संकल्पना या चित्रपटाच्या मेकर्सना एका खास ब्रॅन्डीमुळे सुचली. ‘Louis XIII’ ही प्रसिद्ध ब्रॅन्डी तयार व्हायला १०० वर्षं लागतात, यावरूनच या चित्रपटाची कथा सुचल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार आहे याबद्दल कुठलीच माहिती बाहेर आलेली नाही. या चित्रपटाचे आजवर ३ ट्रेलर आले आहेत पण त्यापैकी एकातही चित्रपटातील कोणत्याही सीनची झलक नाहीये एवढी काळजी मेकर्सनी घेतली आहे. हे ट्रेलर पाहून या चित्रपटात भविष्याची एक अद्भुत कहाणी दाखवली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कुठे आहे हा चित्रपट?
हा चित्रपट पूर्णपणे तयार झालेला असून याची मूळ डिजिटल प्रिंट सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहे. एका अत्यंत सुरक्षित अशा हाय टेक तिजोरीमध्ये या चित्रपटाची डिजिटल प्रिंट जतन करून ठेवलेली आहे. शिवाय बरोबर १०० वर्षांनी १८ नोव्हेंबर २११५ साली आपसूकच ही तिजोरी उघडली जाणार आहे अशी सोय करण्यात आली आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना १०० वर्षांनी होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रीमियरचे तिकीटही देण्यात आले आहे. अर्थात या कलाकारांना हा चित्रपट बघता येणार नाही हे निश्चित आहे. त्यांची नातवंडं हा चित्रपट नक्कीच बघू शकतील.
आणखी वाचा : थलाईवा रजनीकांत ते मक्कल सेल्वन विजय सेतुपती; दाक्षिणात्य सुपरस्टार्सच्या नावामागील बिरुदांचा अर्थ काय?
हे ऐकून सगळ्यांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. १०० वर्षांनी हे जग कसं असेल? किंवा त्या जगात नेमकं काय दाखवलं जाईल? हा चित्रपट त्या काळात कुणी बघेल का नाही? असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आले असतील. अर्थात याची उत्तरं २११५ मध्येच मिळतील आणि तेव्हा आपल्यापैकी कुणी हयात असेल की नाही हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे.