Forts of maharashtra: आपल्या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते म्हणजे गड-किल्ले. किल्ले बांधण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे शत्रूपासून संरक्षण करणे आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे. शत्रूचा हल्ला झाल्यास लोकांना लगेच संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोपे जावे म्हणून हे किल्ले असायचे. यामध्ये राजे-महाराजे, मावळे सुरक्षित असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक नवीन किल्ले बांधले, अनेक गड-किल्ले जिंकले, या सगळ्याचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. तुम्हीही आतापर्यंत अनेक गड-किल्ले फिरला असाल, साधारणपणे प्रत्येक किल्ल्याला मोठे प्रवेशद्वार, मोठ मोठे दरवाजे पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहितीये का, आपल्याकडे असाही एक किल्ला आहे, ज्या किल्ल्याला दरवाजाच नाहीये. असा एकमेव किल्ला ज्याला सुरक्षेसाठी असलेला दरवाजा नाहीये. हा किल्ला कोणता आणि कुठे आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
दरवाजा नसलेला एकमेव किल्ला
महाराष्ट्रात व भारतात शेकडो किल्ले आहेत. परंतु, दरवाजा नसलेला एकमेव किल्ला म्हणजे धारावीचा. अत्यंत छोटासा, परंतु खूपच मोक्याचा असा हा किल्ला आहे. एकेकाळी या संपूर्ण परिसरावर या किल्ल्यावरून टेहळणी केली जायची. मुंबईमधल्या नद्यांमधून जलवाहतूक होत असे व धारावीच्या किल्ल्याला लागून होणाऱ्या व्यापारी मालाच्या बोटींवर नजर ठेवण्याचं काम इथले शिपाई करत असत. याचं कारण असं की, हा किल्ला एकेकाळी दलदलीत होता, याला खाडीतला किल्ला असंही म्हणायचे. त्यामुळे या किल्ल्यात येणारे लोक किंवा शिपाई हे बोटीतून यायचे आणि एका शिडीच्या मदतीने आतमध्ये जायचे.
पाण्यातून बोटींच्यामार्फत होणाऱ्या मालवाहतुकीवरही या किल्ल्यावरून पूर्वी नजर ठेवली जायची. असं बघायला गेलं तर हा किल्ला फार छोटा आहे, मात्र संरक्षणाच्या दृष्टीने शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची जागा आहे. मात्र, एवढं असूनही या किल्ल्याला दरवाजा नाही आणि दरवाजा नसलेला हा एकमेव किल्ला आहे.
हेही वाचा >> मुंबईत १५० वर्षांपूर्वी उभे राहिले पहिले बॅण्डस्टॅण्ड; पण नाव नेमके कसे पडले? जाणून घ्या रंजक इतिहास
किल्ल्याच्या मधोमध भुयारी मार्ग
दरम्यान, किल्ल्याच्या मधोमध एक भुयारी मार्ग आहे. हा मार्ग कुठे जातो याबाबत ठाम माहिती नसली तरीही हा भुयारी मार्ग काही अंतरावर असलेल्या सायन किल्ल्याच्या आत जातो, असे सांगण्यात येते. अशी अतिशय रंजक आणि क्वचितच कुणाला माहीत असलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून आपल्याला मिळते.