भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतला हरहुन्नरी फलंदाज दिनेश कार्तिक हा सध्या भारतीय संघाबाहेर आहे. २०१९ मध्ये पार पडलेल्या विश्वचषक संघात दिनेश कार्तिकला स्थान मिळालं होतं…मात्र यानंतर त्याला संघातलं आपलं स्थान टिकवता आलेलं नाही. ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि आता लोकेश राहुल या खेळाडूंमुळे दिनेशचा भारतीय संघात पुनरागमनाचा मार्ग आता खडत झाला आहे. असं असलं तरीही दिनेश तामिळनाडू संघाकडून स्थानिक स्पर्धेत खेळत आहे. मात्र दिनेश कार्तिकबद्दल एक महत्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिनेश कार्तिकच्या सासुबाई सुजॅन इत्तिचेरिया या देखील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू होत्या. १९७० च्या कालखंडात सुजॅन यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून त्यांची कारकिर्द फार मोठी नसली तरीही त्यांनी ७ कसोटी आणि दोन वन-डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारताची स्क्वॅशपटू दिपीका पल्लिकल ही त्यांची मुलगी असून, दिनेश आणि दिपीका पल्लिकलचं काही वर्षांपूर्वी लग्न झालेलं आहे.

आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो. आगामी हंगामासाठीही कोलकात्याची जबाबदारी दिनेशच्याच खांद्यावर असणार आहे. २०१९ साली दिनेशच्या नेतृत्वाखाली कोलकात्याचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नव्हता, मात्र संघ व्यवस्थापनाच्या मते दिनेश कार्तिकला आणखी एक संधी मिळणं गरजेचं आहे.

Story img Loader