अनेक महिला, तरुणी ऑफिसेस किंवा कॉलेजमध्ये जाताना वेगवेगळ्या फॅशन आणि स्टाईलिंग ट्रेंड फॉलो करताना दिसतात. यात हाय हिल्स वापरणं तर अनेकींच्या रुटीनचा भाग झाला आहे. आपण वेगवेगळ्या लुकनुसार हाय हिल्सचा वापर करतो. यामुळे आता हाय हिल्स अनेकींचे फॅशन स्टेटमेंट बनलं आहे. अनेकजणी आपल्या आवडीनुसार, हाय हिल्स खरेदी करताना दिसतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, मुलींसाठी फॅशन ट्रेंड असलेल्या हाय हिल्स एकेकाळी पुरुषांचा फॅशन ट्रेंड होता. होय… हाय हिल्स या यापूर्वी खास पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या. पण, त्या पुरुषांसाठी का बनवल्या गेल्या होत्या जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हाय हिल्स खरचं पुरुषांसाठी बनवल्या होत्या का?

टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, जर आपण हाय हिल्सचा ट्रेंड पाहिला तर त्याची सुरुवात घोडेस्वारीसाठी वापरल्या जाणार्‍या शूजपासून होतो. पूर्वीच्या काळी इराण किंवा पर्शिया लोक घोडेस्वारी करायचे. यात काही घोडेस्वार चांगले धनुर्धारीही होते, एखाद्या परिस्थितीत जेव्हा धनुर्धाऱ्यांना धावत्या घोड्यावरून बाण सोडण्याची वेळ येत होती, तेव्हा पायातील हाय हिल्स पकड मजबूत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरत होते. यामुळे ते घोड्यावर बसूनही अधिक प्रभावीपणे बाण सोडू शकत होते.तसेच यामुळे पायांचेही संरक्षण व्हायचे. यामुळे हाय हिल्सची उत्पत्ती १० व्या शतकाच्या आसपास पर्शियामधून झाल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर १५९९ साली अशी वेळ आली, जेव्हा पर्शियाच्या शाह अब्बासने आपला राजदूत युरोपला पाठवला, तेव्हा हे हाय हिल्स शूजही त्याच्यासोबत युरोपात पोहोचले. मग हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये एक वातावरण तयार होऊ लागले की, हाय हिल्स शूजमुळे पुरुष अधिक मर्दानी आणि धैर्यवान दिसतात. पूर्वी हाय हिल्स शूजचा ट्रेंड फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित होता, पण हळूहळू सर्वसामान्यांमध्येही वाढू लागला. या शूजना पूर्वी ‘राइडिंग हिल्स’ किंवा ‘लुईस हिल्स’ असेही संबोधले जायचे.

असे म्हटले जाते की, फ्रान्सचा राजा लुई चौदावा याची उंची फक्त ५ फूट ४ इंच होती. पण, तो उंच दिसावा यासाठी १० इंचाचे हाय हिल्स शूज वापरायचा.

हाय हिल्सची स्टाईल पुरुषांकडून महिलांपर्यंत कधी पोहोचली?

अनेक वर्षे पुरुषांमध्ये हाय हिल्स शूज घालण्याचा ट्रेंड टिकून होता. परंतु, १७ व्या शतकाच्या शेवटापर्यंत पुरुषांनी हाय हिल्स घालणे जवळजवळ बंद केले. यावेळी अनेक पुरुष हाय हिल्स खरेदी करणे म्हणजे पैशांची एकप्रकारे उधळपट्टी असल्याचे समजू लागले. त्यामुळे हळूहळू पुरुषांमध्ये हाय हिल्सचा ट्रेंड कमी होऊ लागला.

या काळात महिलांच्या फॅशन ट्रेंडमध्येही बदल सुरु होते. यामुळे बाजारात हाय हिल्सची मागणी तशीच राहिली पण हळूहळू महिला त्याचा वापर करु लागल्या. १८ व्या शतकात मेरी अँटोइनेटसारख्या फ्रेंच फॅशन डिझायनर्सनी स्त्रियांसाठी हाय हिल्सचा नवा ट्रेंड बाजारात आणला. यामुळे १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हाय हिल्स महिलांचा फॅशन ट्रेंड म्हणून पुन्हा लोकप्रिय होऊ लागल्या. या काळात हाय हिल्स संदर्भात आणखी एक वातावरण निर्मिती झाली की, हाय हिल्समध्ये स्त्रिया अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. तेव्हापासून भारतासह जगभरातील महिला हाय हिल्सना पसंती देऊ लागल्या. आजही अनेक महिलांच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी हाय हिल्सचे जोड पाहायला मिळतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know high heels were originally designed for men will boys wear high heels again it was first made for men only sjr