How Many Vande Bharat Trains Are Running In India: भारतामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशामध्ये आतापर्यंत किती वंदे भारत ट्रेन धावतात हे जाणून घ्या. २१ नोव्हेंबरपर्यंत १३६ वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून ३ कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत गाड्या पहिल्यांदा १५ फेब्रुवारी २०१९ रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील २८० हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत.
२१ नोव्हेंबरपर्यंत १३६ वंदे भारत ट्रेन सुरक्षा वैशिष्ट्ये आणि आधुनिक प्रवासी सुविधांसह कार्यरत आहेत, अशी सरकारने लोकसभेला माहिती दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनमध्ये स्वयंचलित संरक्षण प्रणालीपासून अनेक सुविधा आहेत.
वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये
वंदे भारत ट्रेनची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेतून करण्यात आली आहे. ही रेल्वे भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड रेल्वे म्हणून ओळखली जाते. वंदे भारत रेल्वे ही पूर्णतः वीजेवर धावणारी रेल्वे आहे. साधारणपणे, वेगळं इंजीन (लोकोमोटिव्ह) आणि त्याला जोडलेले डबे अशा स्वरुपातील रेल्वेने आपण पूर्वी प्रवास करायचो.पण गेल्या काही काळात जगभरातील रेल्वेंमधील वेगळ्या इंजीनद्वारे ओढल्या जाणार्या गाड्यांचं स्वरूप बदलून त्यांची जागा इंजीनरहीत तंत्रज्ञानाने घेण्यास सुरुवात झाली आहे.डब्यांच्या खालील रचना बदलण्यात आल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होते. सर्व डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे लावलेले असतात. त्याचं नियंत्रण रेल्वे चालकांकडे असतं.
हेही वाचा >> World’s Most Expensive Train: ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी ट्रेन, तिकीट लाखोंच्या घरात; भाडं वाचून चक्रावून जाल
२०१९ ला पहिली वंदे भारत रुळावर
१५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून तिचं उद्घाटन केलं होतं. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती. दिल्ली ते वाराणसी हे ७५९ किलोमीटरचं अंतर ही रेल्वे केवळ ८ तासांत पूर्ण करते. भारतातील वेगवान रेल्वेंच्या यादीत आघाडीवर असलेल्या शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमधून हाच प्रवास करण्यास ११ ते साडेअकरा तासांचा वेळ लागतो. त्यामुळे पहिल्यावहिल्या वंदेभारत एक्सप्रेसचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं.