Indian Railway Fact : भारतीय रेल्वेचं जाळं फार मोठं आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रेल्वे सेवा विस्तारलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येकानेच ट्रेनने प्रवास केलेला असतो. शहरांतर्गत असलेली लोकल असो वा राज्यांतर्गत फिरणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस किंवा सुपरफास्ट एक्स्प्रेस असो. जलद आणि कमी खर्चाच्या प्रवासासाठी नेहमीच रेल्वे वाहतुकीचा विचार केला जातो. प्रवास करताना तुम्ही रेल्वेचे विविध हॉर्न ऐकलेले असतील. कर्णकर्कश हॉर्नचा आवाज येताच तुम्ही दचकन कानावर हात ठेवून घाबरलाही असाल. पण तुम्हाला माहितेय का रेल्वेचे ११ प्रकारचे हॉर्न असतात. या विविध हॉर्नचे अर्थही वेगवेगळे असतात. इंडिया रेल इन्फो या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. खाली दिल्यानुसार लहान हॉर्न म्हणजे अल्पकालीन हॉर्न आणि मोठा हॉर्न म्हणजे दीर्घकालीन हॉर्न.
एक लहान हॉर्न
जेव्हा रेल्वेतून एका लहान हॉर्नचा आवाज येतो, तेव्हा मोटरमन ती ट्रेन यार्डमध्ये स्वच्छतेसाठी घेऊन जाणार असतो.
दोन लहान हॉर्न
ट्रेन सुरू करण्याआधी गार्डकडून सिग्नल मिळण्यासाठी मोटरमन दोन लहान हॉर्न वाजवतात.
एक मोठा हॉर्न
मोठ्या हॉर्नचा अर्थ असा असतो की ट्रेन सुटली असून पुढील सिग्नल व्यवस्थित आहे.
हेही वाचा >> रेल्वेच्या दाराजवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते माहितीये? ‘हे’ आहे यामागील खरं कारण…
एक मोठा आणि एक लहान हॉर्न
ट्रेन सुरू करण्याकरता मुख्य मार्ग सुरळीत असून ब्रेक सोडण्याकरता एक मोठा आणि एक लहान हॉर्न वाजवला जातो.
दोन मोठे हॉर्न आणि दोन लहान हॉर्न
गार्डला ट्रेनच्या इंजिनापर्यंत बोलवायचं असेल तर दोन मोठे आणि दोन लहान हॉर्न वाजवले जातात.
दोन लहान हॉर्न आणि एक मोठा हॉर्न
ट्रेनमधील प्रवाशांनी अलार्म चेन खेचल्यास दोन लहान आणि एक मोठा हॉर्न वाजला जातो.
तीन लहान हॉर्न
तीन लहान हॉर्न आपत्कालीन परिस्थिती वाजवला जातात. ट्रेन जेव्हा मोटरमनच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा गार्डच्या मदतीसाठी तीन लहान हॉर्न वाजवले जातात.
चार लहान हॉर्न
अपघात किंवा इतर कोणत्याही कारणांनी ट्रेन पुढे जाऊ शकत नसेल तर चार लहान हॉर्न वाजवले जातात.
एक दीर्घ हॉर्न
ट्रेन एखाद्या स्थानकावरून जाणार असेल आणि प्लॅटफॉर्मवर थांबणार नसेल तर एक दीर्घ हॉर्न दिला जातो. जेणेकरून प्रवासी सावध होतात. तसंच, ट्रेन एखाद्या बोगद्यातून जाणार असेल तरीही एक दीर्घ हॉर्न वाजवला जातो.
एक मोठा आणि एक छोटा हॉर्न दोनवेळा वाजवणे
ट्रेनमधील प्रवाशांनी अलार्म चेन खेचली असून गार्डने तत्काळ दाखल होण्याकरता अशाप्रकारचा हॉर्न वाजवला जातो.
सहा लहान हॉर्न
ट्रेन चुकीच्या रुळावरून जात असेल किंवा कोणताही इतर धोका जाणवत असेल तर मोटरमन सहा लहान हॉर्न वाजवतात.