भारतामध्ये पहिल्यांदा ट्रेन १८५३ मध्ये चालवण्यात आली होती. तेव्हा ट्रेन बोरीबंदरपासून (आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स) ठाणे या दोन स्थानकांदरम्यान धावली होती. त्यानंतर भारतामध्ये रेल्वे हे दळणवळण-प्रवासाचे प्रमुख माध्यम बनले. भारतीय रेल्वेचं नेटवर्क ही जगातील तिसरं मोठ्ठं रेल्वे नेटवर्क आहे. सध्या रेल्वेचं हे जाळं १,२७,७६० किमी इतक्या अंतरावर पसरलेलं आहे. सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रमुख संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेबद्दल बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. अशाच एका गोष्टीची माहिती घेऊयात.
भारतीय रेल्वेचा ‘शुभंकर’
एखाद्या कंपनीचा, संस्थेचा शुभंकर म्हणजे मॅस्कॉट त्या-त्या संस्थेबाबत थोडक्यात माहिती देत असतो. काही वेळेस हा मॅस्कॉट त्या संस्थेची ओळख देखील बनतो. अमूल गर्ल हे याचं उत्तम उदाहरण आहे. भारतीय रेल्वेचा शुभंकर आहे ‘भोलू हत्ती’. त्याला भोलू द गार्ड असेही म्हटले जाते. २००२ साली भारतीय रेल्वेला १५० वर्ष पूर्ण झाली. याच निर्मित्ताने अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि भारतीय रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्तपणे भोलूची निर्मिती करण्यात आली होती.
भोलूची ओळख
२४ मार्च २००३ रोजी भोलू अधिकृतरित्या भारतीय रेल्वेचा शुभंकर बनला. करड्या रंगाच्या भोलूचा रेल्वे कर्मचाऱ्यांप्रमाणे पोशाख आहे. त्याच्याकडे निळ्या रंगाचा कोट, गडद निळी टाय आणि डोक्यावर पांढऱ्या-निळ्या रंगाची टोपी आहे. त्याच्या हातामध्ये रेल्वेचा हिरवा झेंडा पाहायला मिळतो. त्याव्यतिरिक्त तो हातामध्ये हिरवा कंदील घेत उभा असल्याचेही दिसते. १६ एप्रिल २००३ रोजी बंगळुरु रेल्वे स्टेशनच्या क्रंमाक १ वर सायंकाळी ६.२५ ला येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसद्वारे भोलूचे अनावरण करण्यात आले.
भोलूची निवड कशी झाली?
शुभंकर म्हणून भोलू हत्तीची निवड का करण्यात आली याबद्दल रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, हत्ती या प्राण्याचा वापर फार पूर्वीपासून दळणवळणासाठी केला जात होता. अवजड सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांच्या वापर केला जात असे. हत्तीप्रमाणे भारतीय रेल्वे प्रवासामध्ये मदत करते. त्याशिवाय हत्तीचा आकार भारतीय रेल्वेची भव्यता दर्शवतो. म्हणून भोलूद्वारे रेल्वेची नैतिक बाजू, विश्वासार्हता हे गुण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.