Mumbai city history : ‘मुंबई मेरी जान’ असे म्हणत आपण मुंबईकर नेहमी रुबाबात वावरत असतो. मुंबईत खूप जुन्या वास्तू अजूनही जतन केलेल्या पाहायला मिळतात. म्हणूनच मुंबई हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. मुंबईबाहेरच्या लोकांचं मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईतील वेगवेगळी मार्केट्स. खास मुंबईबाहेरूनही लोक मुंबईत खरेदीसाठी येतात. कित्येक मुंबईकर मुंबईतली कदाचित सगळी छोटी-मोठी मार्केट्स फिरले असतील. मात्र, तुम्हाला माहितीये का मुंबईतलं सगळ्यात जुनं मार्केट कोणतं आहे?
मुंबईतलं सगळ्यात जुनं मार्केट कोणतं ?
जेव्हा मुंबई एक किलोमीटर लांब व अर्धा किलोमीटर रुंद एवढीच होती तेव्हा मुंबईतलं सगळ्यात जुनं मार्केट या भागात होतं आणि त्याला ब्रेड मार्केट म्हणत. आजही रस्त्याचा इथला फलक ब्रेड मार्केट स्ट्रीट म्हणून आपली ओळख दाखवून देतो. मिंट रोडजवळच्या याच भागात भारतीय शैलीतलं कारंजं आहे; जे रतनजी मूळजी जेठा या भाटिया समाजाच्या गृहस्थानं आपल्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ बांधलं.
जाणून घ्या नावाबरोबरच रंजक गोष्ट
दरम्यान, मुंबईतलं सर्वांत जुनं जे मार्केट आहे, त्याचं नाव फोर्ट मार्केट, असं आहे; मात्र, इंग्रजांनी या मार्केटचं नाव ब्रेड मार्केट, असं ठेवलं. या मार्केटमधून इंग्रज लोक न्याहारीसाठी अंडी व पाव विकत घ्यायचे म्हणून त्याला ते ‘ब्रेड मार्केट’ म्हणायचे. पुढेही मग या मार्केटचं नाव ब्रेड मार्केट म्हणूनच कायम झालं. या रस्त्यावर अजूनही फलक आहे, ज्यावर ब्रेड मार्केट स्ट्रीट, असं लिहिलेलं आहे. याच नावाला जागणारी एडवर्ड बेकरी अजूनही आहे; जी ब्रिटिश काळातील आहे.
मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली कोणतीच व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. त्यामुळेच मुंबईला ‘स्वप्ननगरी’, असं म्हटलं जातं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या सध्या तीन कोटींहून अधिक आहे. पण, काही शतकांपूर्वी मुंबई एक सामान्य शहर होतं; मात्र कालांतरानं ते बदलत गेलं. मात्र, आणखी काही अशा वास्तू आहेत, ज्या मुंबई महापालिकेनं आजही जशा होत्या तशा स्वरूपात जतन केल्या आहेत.
हेही वाचा >> ११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती पर्यावरणस्नेही बससेवा; पण बंद का झाली? जाणून घ्या इतिहास
अशी अतिशय रंजक व क्वचितच कुणाला माहीत नसलेली माहिती लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेद्वारे आपल्याला मिळते.