Difference Between Hotel and Motel: शाळकरी मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागतील. त्यामुळे मुलं आता आपल्या पालकांबरोबर फिरायला जाण्याच्या तयारीत आहेत. पण, बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं की, राहण्याची सोय बघावी लागते. तिथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था कशी असेल? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. मग बाहेर जायचं म्हटलं की, राहण्यासाठी बरेच जण हॉटेलचा पर्याय निवडतात. पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही मॉटेलही पाहिली असतील. हॉटेल आणि मॉटेल हे दोन्ही लोकांना राहण्याची सुविधा देतात. मात्र, दोघांच्या सुविधांमध्ये फरक असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? घरापासून दूर असलेल्या या ठिकाणी प्रवाशांना शांततापूर्ण वातावरणाबरोबरच सुखसोई मिळतात. पण, अनेकांना हे माहीत नाही की, हॉटेल आणि मॉटेलमध्ये फरक आहे. चला तर मग हॉटेल आणि मॉटेलमध्ये नेमका काय फरक असतो त्याविषयी जाणून घेऊ…
हॉटेल आणि मॉटेलमधील फरक
हॉटेल (Hotel)
भारतात खाण्यापिण्याच्या ठिकाणाला सर्वसामान्यपणे हॉटेल, असे म्हटले जाते; मात्र तसे नसते. हॉटेल म्हणजे लोकांना राहण्यासाठी उपलब्ध असलेली निवासयोग्य जागा. जर तुम्हाला कोणत्या शहरात फिरायचे असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी हॉटेल्स मिळतील. हॉटेल्स ही पर्यटनस्थळे, विमानतळ, रेल्वेस्थानक, अशा शहराच्या मुख्य ठिकाणी असतात. हॉटेलमध्ये प्रवाशांच्या सोईसाठी खोल्या असतात, ज्यामध्ये त्या परिसरात फिरायला येणारे पर्यटक निवासासाठी थांबतात. हॉटेलमध्ये राहताना तुम्हाला आरामदायी आणि विलासी अनुभव मिळावा यासाठी हॉटेलच्या डिझाईन आणि आर्किटेक्चरमध्ये पूर्ण काळजी घेतली जाते.
हॉटेलच्या खोल्यांमध्ये जेवण, टीव्ही, फ्रिज, टेलिफोन, मिनी बार व रूम सर्व्हिस यांसारख्या सुविधा असतात. हॉटेलमध्ये पार्किंग, किचन, स्विमिंग पूल अशा आणखी काही सुविधा असतात. त्याशिवाय अनेक हॉटेल्सच्या नावांपुढे रेटिंगचे स्टार दिलेले असतात. त्या रेटिंगनुसार प्रत्येक हॉटेलमध्ये राहण्याचा वेगवेगळा खर्च असतो आणि त्यानुसार तिथे सुविधा दिल्या जातात. हॉटेलला जितके कमी स्टार तितक्या सुविधादेखील तेथे कमी मिळतात. जगभरात हॉटेल्स वन स्टार, टू स्टार, थ्री स्टार, फोर, फाइव्ह स्टार व सेव्हन स्टार अशा कॅटेगरीत विभागलेली असतात. त्यामध्ये ग्राहकांना दिली जाणारी सुविधासुद्धा विविध प्रकारची असते. भारतात ताज, ओबेरॉय, रॅडिसन, ली मेरिडियन ही नामांकित हॉटेल्स आहेत.
मॉटेल (Motel)
मॉटेल हा शब्द मोटर (Motar) आणि हॉटेल (Hotel) या दोन शब्दांना जोडून तयार करण्यात आला आहे. मॉटेल्स ही बहुधा महामार्गानजीक पाहायला मिळतात. लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विश्रांतीची सोय मॉटेलमध्ये केली जाते. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करून मॉटेल्स बनविण्यात आली आहेत. मॉटेलमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी खोल्या असतात. त्यामध्ये अधिक खोल्या नसतात. या खोल्या जास्त मोठ्या नसतात. त्यामध्ये अधिक सुविधासुद्धा दिल्या जात नाहीत. मॉटेलमध्ये ग्राहकांसाठी मोठी पार्किंग सुविधा उपलब्ध केलेली असते. मॉटेलमध्ये तुम्हाला रात्र काढण्यासाठी काही गरजेच्याच सुविधा दिल्या जातात. हॉटेल रूममध्ये तुम्हाला अनेक लक्झरी सुविधा मिळतात; पण मॉटेलमध्ये कमी सुविधा मिळतात. त्यामुळे मॉटेलमध्ये थांबण्यासाठी फार कमी खर्च येतो.