आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही पूजा विविध आरत्या हौशीने आणि भक्तिभावाने म्हटल्या जातात. आपण वर्षानुवर्षे आरत्या ऐकत आलेले असतो, त्यामुळे त्या सहजरित्या पाठ झालेल्या असतात. परंतु, या आरत्यांचे अर्थ आपल्याला माहीत असतात का ? आरतीमधील प्रत्येक शब्द हा विशिष्ट अर्थाने उपयोजिलेला असतो. दोन दिवसावर आलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या युगे अठ्ठावीस विटेवरी उभा या आरतीचा अर्थ जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विठ्ठलाच्या आरत्या

एकाच देवतेच्या दोन-तीन आरत्या आपल्याला सहजरित्या दिसतात. विठ्ठल देवतेचेही तसेच आहे. संत नामदेवांची रचना असलेली ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही आरती सर्वांना माहित आहे. तसेच ‘येई हो विठ्ठले माझे माउली ये’, ‘आरती अनंतभूजा’, ‘संत सनकादिक भक्त मिळाले अनेक’, ‘ओवाळू आरती माझ्या पंढरीराया’ याही विठ्ठलाच्या आरत्या प्रसिद्ध आहेत. संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांच्या या रचना आहेत.

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ आरतीचा अर्थ

‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ ही आरती सर्वांना तोंडपाठ असते. परंतु, ‘युगे अठ्ठावीस’ म्हणजे किती युगे ? सर्वांना ४ युगे माहीत असतात. सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांची १२ हजार दिव्यवर्षे अध्यात्मामध्ये मानलेली आहेत. अशी एकसहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. त्याला कल्प असे म्हणतात. त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात; म्हणजेच सुमारे ७१ चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो. त्यालाच मन्वंतर असे नाव आहे. ब्रह्मदेवाचे आयुर्मान १०० ब्राह्मवर्षे एवढे असते. त्यातील ५० ब्राह्मवर्षे संपून ५१ व्या वर्षातला पहिला श्वेतवाराह नामक कल्प सध्या सुरू आहे. त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली़ तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतरे पूर्ण झाली असून, सध्या सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतरापासून एकूण युगे विचारात घेतली, तर आताचे कलीयुग हे अठ्ठाविसावे युग आहे. विठ्ठल अठ्ठावीस युगे आहे, म्हणजेच वैवस्वत मन्वंतरापासून तो आहे. सृष्टीच्या आधीपासून विठ्ठल विटेवर उभा आहे. ‘वामांगी रखुमाई’ म्हणजे विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाई आहे. विठ्ठल रखुमाई यांच्या युगल मूर्तींमध्ये ती डाव्या बाजूला दिसते. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा पुंडलिक आणि विठ्ठलाच्या दर्शनाची कथा इथे अपेक्षित आहे. परब्रह्म म्हणजे विठ्ठल. भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी विठ्ठलाने अवतार घेतला. चरणी भीमा नदी जगाचा उद्धार करण्यासाठी वाहत आहे. भीमा नदी म्हणजेच चंद्रभागा नदी. महाराष्ट्रातील पवित्र नद्यांमध्ये तिची गणना होते. या नदीत स्नान केल्यावर संसारतापातून मुक्तता होते, अशी श्रद्धा आहे.

हेही वाचा : विश्लेषण : प्राचीन काळी पृथ्वीवर १९ तासांचा दिवस होता ? काय सांगते नवीन संशोधन

रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा म्हणजे काय ?

आपल्याला विठ्ठलाची पत्नी रखुमाई/रुक्मिणी माहीत आहे. मग ‘राईच्या वल्लभा’ का म्हणतात ? ‘राई’ हे पाठभेद असू शकतात. राहीच्या वल्लभा असे त्याचे मूळ रूप आहे. राही म्हणजे राधा होय. आता राधा आणि विठ्ठलाचा काय संबंध ? तर विठ्ठल ही देवता विष्णूचा अवतार मानली जाते. विष्णू आणि लक्ष्मी हे शाश्वत युगल आहे. विष्णूच्या कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी ही त्याची पत्नी आणि राधा ही आध्यात्मिक आदिबंधात्मक प्रेयसी होते, असे मानले जाते. यावरून रुक्मिणी कृष्णावर रागावली होती, या कथा हरिवंशकथांमध्ये दिसतात. कृष्णाचा पुढील अवतार विठ्ठल असे दशावतारांमध्ये मानले जाते. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण यांच्या रुपक कथांमध्ये साम्य दिसते. रुक्मिणी आणि विठ्ठल यांची मंदिरे वेगवेगळी असण्याचेही हे कारण आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या आरतीमध्ये रखुमाईसह राई/राहीचा उल्लेख आहे. अजून एक संदर्भ असा मिळतो की, राईच्या वल्लभा म्हणजे पृथ्वीच्या वल्लभा होय.

गरुड हनुमंत पुढे उभे रहाती म्हणजे काय ?

विठ्ठलाच्या आरतीच्या दुसऱ्या पदामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन आहे. तुळशीमाळा त्याच्या गळ्यात आहेत. दोन्ही कर (हात) कटी (कमरेवर) ठेवलेले आहेत.कासे (कमरेला) पीतांबर (पिवळ्या रंगाचे सोवळ्यासारखे वस्त्र) परिधान केले असून लल्लाटी (कपाळावर) कस्तुरीचा टिळा लावला आहे.
(विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परब्रह्माच्या) भेटीकरिता देव सुरवर (श्रेष्ठ देवदेवता) नित्य येत असतात. गरुड आणि हनुमंत नेहमी हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात. हे वर्णन आणि विष्णूचे वर्णन यामध्ये साम्य आहे. तुळशीपत्र विष्णूला अत्यंत प्रिय आहेत. विष्णू देवता पीतांबर धारण करते. हनुमंत या देवतेचा इथे उल्लेख आहे. कारण, विष्णूचा सहावा अवतार प्रभू श्रीराम आहेत. श्रीरामांसमोर हनुमंत (दास मारुती) कायम असतो. विष्णूच्या नवव्या अवतारात विठ्ठलाला गृहीत धरले जाते. त्यामुळे प्रभू श्रीरामांचा दास असणारा हनुमंत याही अवतारात विठ्ठलासमोर दिसतो. गरुड हे विष्णूचे वाहन आहे. त्यामुळे विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानलेला असल्यामुळे गरुडाचाही इथे उल्लेख दिसतो.

हेही वाचा : विश्लेषण : कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ का होत आहे? कुत्र्यांच्या आक्रमकतेतील वाढीची कारणं काय?

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती की ओवाळू आरती सुरवंट्या येती ?

आरत्यांमध्ये अनेक पाठभेद झालेले दिसतात. काही लोक सुरवंट्या म्हणतात. परंतु, मूळ शब्द ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती असा आहे. कुर्वंड्या म्हणजे द्रोणातील दिवे होय. वारकरी, भक्तजन कुर्वंड्या म्हणजे द्रोणातून दिवे घेऊन येतात आणि ते चंद्रभागेमध्ये सोडून देतात. पुढे नामदेव म्हणतात, दिंडी, पताका, ध्वज घेऊन भक्तगण, वारकरी आनंदाने देहभान हरपून नाचत असतात. असा हा पंढरीचा महिमा महान आहे.

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ही ओळ आरत्यांमध्ये समान दिसते का ?

विठ्ठलाच्या आरतीमधील शेवटच्या पदामध्ये वारीचे वर्णन आहे. आषाढी कार्तिकीला वारकरी येतात. चंद्रभागेमध्ये म्हणजेच भीमानदीत स्नान करून पवित्र होतात. ‘दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति’ क्षणभर झालेल्या दर्शनाने ते भवसागरातून मुक्त होतात. मुक्त होणे म्हणजे मृत्यू नव्हे. आत्यंतिक आनंद, समाधान, राग-लोभ आदी गोष्टींपासून मुक्तता म्हणजे मुक्ती होय. संत नामदेवांनी गणपतीच्या रचलेल्या आरतीमध्ये…’ हा चरण दिसतो. ‘दर्शनहेळामात्रे गंधपुष्पेदुर्वा तुजला जे वाहती। ते नर भाग्यवंत लक्ष्मी पावती। दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती। सहज नामा याणे गायिली आरती। तोच चरण विठ्ठलाच्या आरतीमध्ये दिसतो. दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।केशवासी नामदेव भावे ओवाळिती… इप्सित देवतेचे दर्शन हे भक्ताला मुक्तिप्रद, आनंद देणारेच असते.

हेही वाचा : स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान

आपण वेगवेगळ्या आरत्या आनंदाने म्हणतो. परंतु, त्यांचा अर्थ जाणून म्हटल्या तर त्या देवतेविषयीचा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होईल. कारण, अर्थ जाणून केलेली कोणतीही कृती ही फलदायी असते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the exact meaning of vitthalas aarti vvk
Show comments