अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी ‘अॅनिमल’ची सर्वत्र चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाची २ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली असून त्यातून जवळपास ७ कोटींची कमाई या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच केली आहे. चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. जेव्हा ‘अॅनिमल’चा प्री-टीझर प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हा रणबीरच्या धासु अॅक्शनमागे काही शीख समुदायातील माणसं एक पंजाबी गाणं गाताना दिसली होती.
तेव्हा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की त्या काही सेकंदांच्या टीझरमध्ये ते गाणे नेमके का घेण्यात आले होते. आता ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटातील ‘अर्जन वेल्ली’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले अन् या गाण्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. पंजाबी भाषेतील हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे, पण तुम्हाला या गाण्याचा इतिहास ठाऊक आहे का? आज या गाण्याचा नेमका इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
हे पंजाबमधील ‘धाडी-वार’ शैलीतील गाणे असून ते गुरु गोविंद सिंह यांच्या काळात मुघलांशी लढताना योद्ध्यांना स्फुरण यावं यासाठी म्हंटले जायचे. याला एकप्रकारचा युद्धाचा आक्रोश (वॉरक्राय)असंही म्हंटलं जातं. हे मूळ गाणं कुलदीप मानक या पंजाबी गायकाने प्रथम गायलं होतं. ‘अर्जन वेल्ली’ हे गाणं अर्जन सिंह नलवा यांच्यावर बेतलेलं आहे. अर्जन सिंह नलवा हे शीख-खालसा सैन्याचे सेनाप्रमुख हरि सिंह नलवा यांचे पुत्र होते. हरि सिंह यांना ‘बाघमार’देखील संबोधले जायचे, कारण एकदा त्यांनी एका वाघाचा जबडा हाताने फाडून त्याला ठार मारले होते अन् वेल्ली’चा अर्थ म्हणजे प्रचंड हिंसा.
आपल्या वडिलांनंतर अर्जन सिंह नलवा यांनी आपल्या भावाबरोबर ब्रिटिशांशीसुद्धा लढा दिला होता. ‘अॅनिमल’मधील ‘अर्जन वेल्ली’ हे गाणंदेखील या कहाणीचंच रुपक म्हणून वापरण्यात आलं आहे. ‘अॅनिमल’मध्येही पिता-पुत्राच्या नात्याबद्दलची एक हिंसक गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी या गाण्याचा एक रुपक म्हणून या चित्रपटात उत्तमरित्या वापर केल्याचा दिसत आहे. शिवाय इतर भाषांमध्येही हे गाणं आहे तसंच सादर करण्यात आलं आहे, याचं भाषांतर केलं तर यातील मूळ भावनाच कुठेतरी हरवेल असं संदीप यांनी स्पष्ट केलं होतं.